पोलिसाला प्री वेडिंग शूटचे वेड पडले महागात 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 August 2019

त्याने प्री वेडिंग शूटसाठी वर्दीचा वापर केल्याबद्दल त्यांनी आक्षेप घेतला नसून, वर्दीमध्ये लाच स्वीकारत असल्याने पोलिसांची चुकीची प्रतिमा निर्माण होत आहे.

 

राजस्थान  : प्री वेडिंग शूट करण्याचे वेड सध्या लग्नाळूंना मोठ्या प्रमाणात लागलेलं दिसतं. अनेक तरुण-तरुणी प्री वेडिंग शूटसाठी अफाट पैसादेखील खर्च करत आहेत. बॉलीवूडच्या गाण्यांनादेखील लाजवतील अशी प्री वेडिंग शूटची गाणी बनवली जात आहेत.

त्यासाठी सुंदर लोकेशन्स, गाण्याच्या शूटिंगसाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर; तसेच गाणे शूट करण्यासाठी वेगवेगळ्या थिम्सचा वापर करत, गाणी अधिक रोमांचक बनवली जात आहेत. इतकंच नाही; तर प्री वेडिंग शूटमध्ये छोटेछोटे सीनदेखील बनवले जात आहेत. त्यामुळे हे प्री वेडिंग शूट छोट्या-छोट्या फिल्मच असतात. 

राजस्थानमध्ये एका पोलिसानेदेखील आपल्या प्री वेडिंगच्या हौसेपोटी आपल्या वर्दीचा वापर शूटमध्ये केला; मात्र या वेडामुळे त्याच्यावर वरिष्ठ अधिकारी आता नाराज झाले आहेत. त्याला कारणदेखील तसेच आहे. 

या पोलिसाने (धनपत) आपल्या प्री वेडिंग शूटमध्येदेखील पोलिसाची भूमिका पार पाडली. या शूटमध्ये पोलिसाच्या वर्दीत तो किरण (आताची पत्नी) कडून लाच घेताना दिसत आहे. ती तरुणी दुचाकीवरून येताना पोलिस तिला अडवतो, तेव्हा धनपत हा तिला हेल्मेटबाबत विचारणा करतो. तिच्याकडे हेल्मेट नसल्याने तो तिला आपल्या खिशात पैसे टाकण्यास खुणावतो, असा सीन चित्रीत करण्यात आला आहे. 

मात्र यामुळे वरिष्ठ अधिकारी त्याच्यावर नाराज झाले आहेत. त्याने प्री वेडिंग शूटसाठी वर्दीचा वापर केल्याबद्दल त्यांनी आक्षेप घेतला नसून, वर्दीमध्ये लाच स्वीकारत असल्याने पोलिसांची चुकीची प्रतिमा निर्माण होत आहे. यातून पोलिसांबद्दल चुकीचा संदेश जात असल्याचे दिसते. त्यामुळे पोलिस महानिरिक्षकांनी नियमांचा अनादर केल्याबाबत कारवाई करत त्याला नोटीस पाठविली. यानंतर धनपत याने आपली चूक कबूल केली आहे. तसेच पोलिस दलाची प्रतिमा खराब होईल, असे वर्तन न करण्याचे आदेशदेखील पोलिस महानिरिक्षकांनी पोलिसांना दिले आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police get mad at pre wedding shoot