पोलिसांना दाढी ठेवण्यासाठी घ्यावी लागणार परवानगी; योगी सरकारचा मोठा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 October 2020

उत्तर प्रदेश पोलिस महासंचालक एचसी अवस्थी यांनी पोलिस कर्मचाऱ्यांची वर्दी, बूट, केस आणि दाढी याबाबत नवे आदेश जारी केले आहेत

लखनऊ - उत्तर प्रदेश पोलिस महासंचालक एचसी अवस्थी यांनी पोलिस कर्मचाऱ्यांची वर्दी, बूट, केस आणि दाढी याबाबत नवे आदेश जारी केले आहेत. यानुसार शिख धर्मातील पोलिसांशिवाय इतरांना दाढी ठेवण्यास परवानगी नसेल. तसंच शिख धर्माशिवाय इतर सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना क्लिन शेव करणं बंधनकारक असेल. धार्मिक आधारावर केस किंवा दाढी ठेवण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांना त्यांच्या अधिकाऱ्यांकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. 

उत्तर प्रदेशातील बागपत इथल्या रामाला पोलिस ठाण्यातील पोलिस उप निरिक्षक इंतसार अली यांनी परवानगीशिवाय लांब दाढी ठेवल्याने पोलिस अधीक्षकांनी निलंबनाची कारवाई केली होती. पोलिस अधीक्षकांनी इंतसार अली यांना तीनवेळा दाढी करण्यास सांगितलं होतं. तसंच दाढी ठेवण्यासाठी विभागाकडून परवानगी घेण्यासही बजावले होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून इंतसार अली यांनी आदेशाकडे दुर्लक्ष करत दाढी ठेवली. 

हे वाचा - ट्रॅफिक पोलिसानेच झाडूने रस्ता केला साफ; सोशल मीडियात व्हिडिओ होतोय व्हायरल

सहरानपूरमधील रहिवाशी असलेले इंतसार अली उत्तर प्रदेश पोलिसात एसआय पदावर नियुक्त झाले होते. गेल्या तीन वर्षांपासून बागपत जिल्ह्यात ते कार्यरत होते. लॉकडाऊनच्या आधी त्यांना रामाला ठाण्यात नियुक्त केलं होतं. पोलिस विभागाच्या नियमाच्या विरोधात लांब दाढी ठेवल्यानं ते चर्चेत आले होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: up policeman-will-have-to-permission-for-beard new rule