दिल्लीत हिंसक दंगलीनंतर ‘राजकीय दंगल’

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 28 February 2020

राजधानी दिल्लीतील दंगली शमल्या असल्या तरी, हिंसाचार अद्याप थांबलेला नाही. अशा संवेदनशील परिस्थितीत राजकीय वादावादी सुरूच राहिली आहे.

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील दंगली शमल्या असल्या तरी, हिंसाचार अद्याप थांबलेला नाही. अशा संवेदनशील परिस्थितीत राजकीय वादावादी सुरूच राहिली आहे. काँग्रेसने मोदी सरकारला राजधर्माचे पालन करण्याचा सल्ला दिल्यावर खवळलेल्या भाजपने, आम्हाला काँग्रेसने राजधर्मावर प्रवचने देऊ नयेत, असे सुनावले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी २००२ च्या गुजरात दंगलीवेळी मोदी यांनाच राजधर्माचे पालन करण्याचा सल्ला दिला होता. काँग्रेसच्या ताज्या सल्ल्याने भाजपचा तिळपापड झाला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी, सीएएवर लोकांच्या भावना भडकावल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर केला. ‘आर या पार’ची भाषा करणाऱ्या सोनिया गांधी यांनी जमावाला चिथावणी देणारी भाषा वापरल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. ते म्हणाले की, काँग्रेस सरकारनेच २०१० मध्ये एनपीआर लागू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी दहा वर्षांत काही केले नाही व आम्ही केले तर हाच पक्ष लोकांना चिथावणी देतो आहे. भाजप संवेदनशील विषयांचे राजकारण करत नाही, असेही प्रसाद म्हणाले.

एस. एन. श्रीवास्तव दिल्लीचे नवे पोलिस आयुक्त
दिल्लीचे पोलिस आयुक्त अमूल्य पटनाईक उद्या (ता. २९) निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी येणारे एस. एन. श्रीवास्तव यांना आज अतिरिक्त पोलिस आयुक्तपदाची जबाबदारी देण्याची घोषणा गृहमंत्रालयाकडून करण्यात आली. दोन दिवसांपूर्वीच विशेष पोलिस आयुक्तपदाची जबाबदारी मिळालेले श्रीवास्तव यांनी आजही दंगलग्रस्त भागात जाऊन नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या. नायब राज्यपाल अनिल बैजल यांनीही नागरिकांना धीर दिला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दंगलीत घरे जळालेल्यांना २५ हजार रुपयांची मदत तातडीने देण्याची घोषणा केली. 

आजच्या घडामोडी
    दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी शुक्रवारी ईशान्य दिल्लीतील दंगलग्रस्त भागांची पाहणी केली.
    बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी हिंसाचाराची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
    गुप्तचरविभागातील अधिकारी अंकित शर्मा यांना ठार मारण्यापूर्वी जमावाने त्यांना शेकडो वेळा भोसकल्याची धक्कादायक बाब उघड झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Political riots after violent riots in Delhi