PowerAt80 : शरद पवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 12 December 2020

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज 80 वर्षांचे झाले. पवारांचा जन्म डिसेंबर 12, 1940 रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झाला. त्यांचे छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तीन आदर्श आहेत. सर्वप्रथम इ.स. 1967 च्या राज्य विधानसभा निवडणुकीत ते बारामती मतदारसंघातून विजयी झाले. 18 जुलै इ.स. 1978 रोजी शरद पवारांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. इ.स. 1984 सालची लोकसभा निवडणूक पवारांनी लढवली आणि ते लोकसभेवर निवडून गेले. 10 जून इ.स. 1999 रोजी शरद पवारांनी त्यांच्या 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची' स्थापना केली. समकालीन भारताच्या राजकारणातील एक उत्तुंग व्यक्तीमत्त्व म्हणून पवारांचं स्थान निर्विवाद आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज शरद पवार यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शरद पवार यांचा जन्म 12 डिसेंबर,1940 मध्ये झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन म्हटलंय की, शरद पवार यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. देव त्यांना चांगले आरोग्य आणि दिर्घायुष्य देवो. 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, महाविकास आघाडीचे आधारस्तंभ, आदरणीय श्री. शरद पवार साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांची ऊर्जा, उत्साह आम्हा सर्वांना नेहमी प्रेरणा देत राहो हीच सदिच्छा. त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ही शुभकामना.

शरद पवार हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील एक मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जातात. गेल्या अनेक दशकांपासून महाराष्ट्राच्या तसेच देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकून आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PowerAt80 pm narendra modi wishes sharad pawar on his 80th birthday