
Prakash Ambedkar : संसदेचे धार्मिकीकरण धोकादायक; आंबेडकरांची मोदी सरकारवर टीका
नवी दिल्ली : नव्या संसदभवनाचे उद्घाटन करताना धार्मिकतेचे केलेले अवडंबर ही संसदेचे धार्मिकीकरणाची प्रक्रिया असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली. ही कृती देशाच्या लोकशाहीला घातक असल्याचे ते म्हणाले. तसेच अशोक चक्राला गौण ठरवून सेंगोलला दिली गेली असा दावा करत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
ते म्हणाले, नव्या संसद भवनाच्या उद्घाटनामध्ये धार्मिक विधीला काहीही स्थान द्यायला नको होते. देशाच्या संसदीय लोकशाहीमध्ये अशोक चक्राला सर्वाधिक महत्त्व आहे. या अशोक चक्राऐवजी सेंगोलची प्रतिष्ठापना लोकसभा सभागृहात करण्याचे औचित्य राहू शकत नाही.
या सर्व धार्मिक विधीमध्ये आता उत्तर व दक्षिण असे दोन गट पडले आहे. वैदिक परंपरेमध्ये उत्तर व दक्षिणेचा वाद जुना आहे. या वादाला या प्रकारामुळे पुन्हा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. यामुळे हे टाळले असते तर बरे झाले असते, असेही आंबेडकर यावेळी म्हणाले.