माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 1 September 2020

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने देशात सात दिवस दुखवटा जाहीर केला आहे.

नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे सोमवारी सायंकाळी निधन झाले. त्यानंतर आज लोधी स्मशानभूमित त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रणव मुखर्जी यांच्या मेंदूची शस्त्रक्रिया झाली होती आणि त्याआधी घेण्यात आलेल्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आढळला होता. त्यामुळे अंत्यसंस्कारावेळी कोरोनाचे प्रोटोकॉल पाळण्यात आले. मुलगा अभिजीत मुखर्जी यांनी प्रणवदा यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना लष्कराकडून मानवंदना देण्यात आली. तसंच कोरोनामुळे माजी राष्ट्रपतींचे पार्थिव गन कॅरेज ऐवजी हर्स व्हॅन म्हणजेच शववाहिकेतून नेण्यात आले. देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे सोमवारी सायंकाळी वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. 10 ऑगस्टपासून त्यांच्यावर लष्करी रुग्णालयात उपचार सुरु होते. रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2012 ते 2017 या कार्यकाळात त्यांनी देशाचे 13 वे राष्ट्रपती म्हणून कार्य केले. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने देशात सात दिवस दुखवटा जाहीर केला आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pranab mukherjee funeral live updates former president of india pranab mukherjee passes away cremation news