प्रणव मुखर्जी अद्याप कोमातच; लष्करी रुग्णालयाने प्रकृतीबाबत दिली माहिती

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 30 August 2020

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी गेल्या तीन आठवड्यापासून रुग्णालयात आहेत.

नवी दिल्ली - भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी गेल्या तीन आठवड्यापासून रुग्णालयात आहेत. दिल्लीतील लष्करी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मुखर्जींना ब्रेन सर्जरीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याआधी त्यांची कोरोना चाचणीही करण्यात आली होती. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मुखर्जींची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर मुखर्जींची प्रकृती खालावली होती. तसंच त्यांच्या फुफ्फुसाला संसर्ग झाल्याचंही समोर आलं होतं. लष्करी रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, प्रणव मुखर्जी सध्या जीवरक्षक प्रणालीवर आहेत. ते कोमात असून फुफ्फुसाच्या संसर्गावर उपचार केले जात आहेत. सध्या त्यांची प्रकृती हिमोडायनेमिकली स्थिर असून तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर देखरेख करत आहे. 

याआधी शनिवारी हेल्थ बुलेटिन जारी करण्यात आलं होतं. आर्मी रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या फुफ्फुसात संसर्ग झाला असून त्यावर उपचार सुरु आहेत. याअगोदर प्रणव मुखर्जी यांनी 10 ऑगस्ट रोजी ट्वीट करून कोरोनाची संसर्ग झाल्याची माहिती दिली होती.  त्यांना इतर कारणांसाठी हॉस्पिटलमध्ये गेले दाखल केले होते,  तेथे त्यांची कोरोना चाचणी केल्यावर ती पॉझिटिव्ह आली होती. 

स्वीडनमध्ये मुस्लीमविरोधी गटाने कुरानला लावली आग; दंगल उसळली

भारताचे तेरावे राष्ट्रपती म्हणून निवड होण्यापूर्वी मुखर्जी हे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. मुखर्जींनी डॉ. मनमोहनसिंग मंत्रीमंडळात संरक्षण, अर्थ, परराष्ट्र व्यवहार अशी महत्त्वाची खाती सांभाळली आहेत. लोकसभेतील नेते असतानाच त्यांनी काँग्रेस संसदीय पक्ष आणि काँग्रेस विधीमंडळ पक्षाचा प्रमुख ही पदे सांभाळली. त्यांनी जुलै 2012 ते 2017 पर्यंत राष्ट्रपती पद भूषवले. प्रणव मुखर्जींना 2019 मध्ये भारतरत्न पुरस्कारानेही गौरवण्यात आलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pranab Mukherjee still in deep coma said army hospital