...तर भाजप नेत्यांनी आपलं पद सोडावं; पीकेंनी पुन्हा भाजपला डिवचलं

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 22 December 2020

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपवर जोरदार हल्लाबोल सुरु केला आहे.

नवी दिल्ली-  निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपवर जोरदार हल्लाबोल सुरु केला आहे. प्रशांत किशोर यांनी सोमवारी म्हटलं होतं की, विधानसभा निवडणुकीत भाजपला 10 चा आकडादेखील गाठता येणार नाही. आता पीके यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपने विधानसभा निवडणुकीत 200 जागा न जिंकल्यास त्यांच्या नेत्यांनी आपलं पद सोडावं, असं आव्हान त्यांनी केलं आहे. भाजप नेत्यांनी अधिकृतरित्या अशी घोषणा करावी, असंही ते म्हणाले आहेत. 

भाजपला 100 पेक्षा कमी जागा मिळतील! 

भाजपला 10 चा आकडा गाठण्यासाठीही संघर्ष करावा लागेल. भाजपला 100 पेक्षा कमी जागा मिळतील. त्यांना यापेक्षा जास्त जागा मिळाल्या तर मी आपलं काम सोडून देईल, असं पीके म्हणाले आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराची धुरा प्रशांत किशोर यांच्याकडे होती. आता ते पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत आहेत. तृणमूल काँग्रेसची प्रतिमा चांगली करण्याची जबाबदारी पीके यांच्याकडे देण्यात आली आहे. 

गुगलचं शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर पाऊल; दोन भारतीय अ‍ॅप्समध्ये गुंतवले कोट्यवधी

पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राजकीय आखाडा तापू लागला आहे. पीके यांच्यावर भाजपने पलटवार केलाय. जनता जेव्हा उभी राहते, तेव्हा पीके आणि सीके सर्व फीके पडतात. याच प्रशांत किशोरनी बिहारमध्ये तेजस्वी यांचा लालटेन विझवला. आता तृणमूल त्याच दिशेने जाईल, असं भाजप नेते नरोत्तम मिश्रा म्हणालेत. भाजपचे सरचिटणीस आणि पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी टि्वट करत म्हटलं की, पश्चिम बंगालमध्ये भाजपची जी त्सुनामी आहे, ती पाहता सरकार बनल्यानंतर या देशाला एक निवडणूक रणनीतीकार गमवावा लागेल. 

ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांच्याशी करार केला आहे. प्रशांत किशोर हे ममता बॅनर्जींचे भाचे आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्याबरोबर सक्रिय आहेत. परंतु, टीएमसीच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना प्रशांत किशोर यांची कार्यशैली पसंत पडलेली दिसत नाही. काही बंडखोर नेत्यांनी तर प्रशांत किशोर आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या हस्तक्षेपामुळे पक्ष सोडल्याचे सांगितले आहे. 

भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पश्चिम बंगालच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर होते. तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) काही दिग्गज नेत्यांनी मंत्रिपद आणि आमदारकीचा राजीनामा देत अमित शहांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला. माध्यमांतही अमित शहा यांच्या रॅलीला मिळालेला प्रचंड प्रतिसाद दाखवण्यात आला. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prashan kishor challenge to bjp leader paschim bangal election