गुगलचं शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर पाऊल; दोन भारतीय अ‍ॅप्समध्ये गुंतवले कोट्यवधी

टीम ई सकाळ
Tuesday, 22 December 2020

 भारतातल्या दोन शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्मसाठी वापरण्यात येणाऱ्या अ‍ॅपमध्ये गुगलनं गुंतवणूक केलीय. 

नवी दिल्ली - दिग्गज टेक कंपनी गुगलने भारतातील शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅपमध्ये गुंतवणूक केली आहे. एकाच दिवशी भारतातल्या दोन शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्मसाठी वापरण्यात येणाऱ्या अ‍ॅपमध्ये गुगलनं गुंतवणूक केलीय. या दोन अ‍ॅपमध्ये ग्लान्सचं रोपोसो आणि डेलिहंटच्या जोश अ‍ॅपचा समावेश आहे. ही दोन्हीही अ‍ॅप स्थानिक भाषेत उपलब्ध आहेत. 

भारतीय युनिकॉर्न inMobi ची सहाय्यक कंपनी असलेल्या ग्लान्सकडे रोपोसोची मालकी आहे. रोपोसोचे दिवसाला 33 दशलक्ष अ‍ॅक्टिव्ह युजर असून महिन्याला जवळपास 115 दशलक्ष युजर्स आहेत. गुगलने रोपोसो अ‍ॅपमध्ये 145 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली असून यातून कंपनी आता AI क्षमता वाढवण्यासाठी योजना तयार करत आहे. तसंच टेक्नॉलॉजीची मोठी टीम तयार करणे आणि सोबतच विविध प्रकारची सेवा देण्याचा प्रयत्नही गुगल करणार आहे. 

हे वाचा - WhatsApp Web मध्येही आता ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंगची सुविधा

रोपोसोशिवाय आणखी एका शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅपमध्ये गुगलने गुंतवणूक केलीय ते म्हणजे जोश अ‍ॅप. तब्बल 12 स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध असलेल्या जोश अ‍ॅपचे रोजचे 36 दशलक्ष युजर्स असून महिन्याचे युजर्स 77 दशलक्ष इतके आहेत. जोशमध्ये गुगलने 100 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. गुगलसह मायक्रोसॉफ्ट आणि अल्फावेव्ह यांनीसुद्धा डेलीहंटमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. 

हे वाचा - जबरदस्त फीचर्स असलेले, 15 हजारांत मिळणारे टॉप 3 स्मार्टफोन

याआधी गुगलने भारतात 10 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याचं म्हटलं होतं. गुगल फॉर इंडियामध्ये कंपनीने ही घोषणा केली होती. गुगलने आधीच रिलायन्स जिओमध्ये 4.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: google invest in short video platform app roposo and josh