प्रशांत भूषण प्रकरणी सुनावणीला न्यायाधीशांनी दर्शवली असमर्थता

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 August 2020

ज्येष्ठ वकील आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भूषण यांना अवमान प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा सुनावली. त्यांनी न्यायालयाची बिनशर्त माफी मागण्यास नकार दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. 

नवी दिल्ली : ज्येष्ठ वकील आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भूषण यांच्याविरोधातील 2009 मध्ये न्यायालयाच्या अवमान प्रकरणाची सुनावणी 10 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. 2009 मध्ये प्रशांत भूषण यांनी  एक मुलाखत दिली होती.  त्यावेळीसुद्धा त्यांच्याविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याविरोधात खटला चालवला होता. या प्रकरणाची सुनावणी 10 सप्टेंबरला होणार आहे. दरम्यान, ट्वीटरवरून अवमान केल्याच्या दुसऱ्या प्रकरणाची सुनावणी 12.30 वाजता सुरु झाली आहे. 

दरम्यान, प्रशांत भूषण यांच्याविरोधातील 2009 अवमान प्रकरणाच्या याचिकेवर सुनावणीसाठी न्यायाधीश अरुण मिश्रा यांनी असमर्थता दर्शवली आहे. योग्य अशा घटनापीठाकडे हे प्रकरण सोपवावे अशी विनंती त्यांनी सरन्यायाधीशांकडे केली. अरुण मिश्रा म्हणाले की, मी लवकरच निवृत्त होणार आहे. त्यामुळे कमी काळात यावर सुनावणी करणं शक्य नसल्याचंही न्यायाधीशांनी म्हटलं.

ट्विटरवरून अवमान प्रकरणी प्रशांत भूषण यांनी न्यायालयाची बिनशर्त माफी मागण्यास नकार दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आज सुनावणी झाली. न्यायाधीश अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने सरन्यायाधीशांच्या आदेशानुसार 10 सप्टेंबरला दुसऱ्या घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होईल असं स्पष्ट केलं.

प्रशांत भूषण यांनी माफी मागण्यास नकार देताना म्हटलं होतं की, माझी वक्तव्ये ही सद्भावनापूर्ण होती आणि जर मी माफी मागितली, तर माझ्या स्वाभिमान आणि ज्या व्यवस्थेवर सर्वाधिक विश्वास आहे, त्या व्यवस्थेचा अपमान होईल, असे भूषण यांनी म्हटले आहे. 20 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाने प्रशांत भूषण अवमान प्रकरणी शिक्षेवरील सुनावणीला स्थगिती दिली होती. कोर्टाने त्यांना लेखी निवेदनावर पुनर्विचार करण्यास सांगून दोन दिवसांची मुदत दिली होती.

दरम्यान, प्रशांत भूषण यांनी वादग्रस्त ट्विटबद्दल सर्वोच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागण्यास नकार दिला. त्यांनी अवमान प्रकरणी आपली बाजू पुन्हा मांडली होती. मात्र, त्याआधीच सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता आणि सुनावणीची औपचारिकता बाकी होती. त्याआधी प्रशांत भूषण यांना सोमवारपर्यंत बिनशर्त माफी मागण्याची संधी दिली होती. 

सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या उत्तरात प्रशांत भूषण यांनी म्हटलं होतं की, 'माझे ट्वीट सद्भावनापूर्वक होते आणि त्यावर मी ठाम राहणार आहे. मी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर न्याायलयाला उत्तरे देता आली नाहीत. माझं मत आहे की, जर मी माफी मागितली, तर तो माझ्या स्वाभिमानाचा अवमान होईल, आणि ज्या व्यवस्थेचा मी आदर करतो तिचाही अपमान होईल.'

प्रशांत भूषण असंही म्हणाले होते की, 'माझ्या मनात सर्वोच्च न्यायालयाबद्दल जास्त आदर आहे. सर्वोच्च न्यायालय किंवा कोणत्याही सरन्यायाधीशाची बदनामी करण्यासाठी मी हे ट्विट केले नाही, तर चांगले बदल व्हावेत  उलट ते माझे कर्तव्य आहे. माझी टीका ही रचनात्मक, घटनेचे रक्षण होईल आणि लोकांच्या अधिकाराला पूरक अशी आहे. तसेच ती सुप्रीम कोर्ट व्यवस्थेची दिशाभूल होण्यापासून रोखण्यासाठीही आहे.'न्यायव्यवस्था आणि सरन्यायाधीशांविरोधात केलेल्या दोन ट्विटबद्दल सुप्रीम कोर्टाने भूषण यांना दोषी ठरवले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prashant bhushan case Supreme Court defers to September 10