अमित शहांच्या सांगण्यावरून ‘पीकें’चा पक्षप्रवेश - नितीशकुमार

पीटीआय
Wednesday, 29 January 2020

पवन वर्मांचा विरोध
‘जेडीयू’चे नेते पवन वर्मा यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपसोबत आघाडी करण्यास विरोध दर्शविला होता. या अनुषंगाने त्यांनी नितीश यांना तसे पत्रदेखील लिहिले होते. नितीश यांनी आता या पत्राला फारसा अर्थ राहिला नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी पुस्तिकेत नव्याने सहा तरतुदी जोडण्याला नितीश यांनी आक्षेप घेतला असून, २०११ च्या धर्तीवर जुन्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी करत त्यांनी जातिआधारित जनगणनेचा पुनरुच्चारही केला.

पाटणा - बिहारमध्ये संयुक्त जनता दलात (जेडीयू) आता प्रशांत किशोर विरुद्ध नितीशकुमार यांच्यातील संघर्ष शिगेला पोचला आहे. भाजपचे तत्कालीन अध्यक्ष अमित शहा यांच्या सांगण्यावरून प्रशांत किशोर (पीके) यांना पक्षामध्ये घेण्यात आले होते, आता त्यांना पक्ष सोडायचा असेल तर ते बिनधास्तपणे बाहेर पडू शकतात, असे खडे बोल नितीशकुमार यांनी सुनावले आहेत. प्रशांत किशोर यांनीही आपण बिहारमध्ये येऊन नितीशकुमारांना उत्तर देऊ, असे म्हटले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी पुस्तिकेवरून (एनआरसी) प्रशांत किशोर यांनी थेट पक्षाच्याविरोधातच भूमिका घेतल्याने दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. ‘‘आम्ही कुणालाही स्वत:हून पक्षात आणले नव्हते. अमित शहांच्या सांगण्यावरूनच त्यांना पक्षामध्ये घेण्यात आले होते, आता त्यांना पक्ष सोडायचा असेल, तर ते बिनधास्तपणे बाहेर पडू शकतात. पक्षामध्ये राहायचे असेल तर त्यांना प्रत्येकाला नियम आणि सिद्धांत पाळावेच लागतील,’’ अशा शब्दांत नितीश यांनी प्रशांत किशोर यांना ठणकावले.

Video:अर्णब गोस्वामींच्या विमानातील व्हिडिओमुळं ट्विटरवर धुमाकूळ 

पीके ‘आप’च्या कामी
प्रशांत किशोर हे आता आम आदमी पक्षासाठी रणनिती आखत असल्याचे मला समजले, त्यांना आता ‘जेडीयू’मध्ये राहायचे की नाही, याचा निर्णय त्यांनी घ्यावा. आमचा पक्ष मोठ्या लोकांचा नाही, जेथे कुठल्याही मुद्यावर कुणीही रोज ट्‌विट आणि मेल करावा. प्रत्येक जण आपली बाजू मांडण्यासाठी स्वतंत्र आहे. आता एक नेते (पवन वर्मा) पत्र लिहितात आणि दुसरे (प्रशांत किशोर) ट्‌विट करत असतात. पक्षात राहायचे की नाही, याबाबतचा निर्णय घ्यायला दोघेही स्वतंत्र आहेत, असे नितीश यांनी स्पष्ट केले. प्रशांत किशोर यांनी आधीही पक्षविरोधी भूमिका मांडली होती. 

नितीशजी यांचे बोलून झाले आहे, आता माझ्या उत्तराची वाट पाहा. मी त्यांना उत्तर देण्यासाठी बिहारमध्ये जाणार आहे.
- प्रशांत किशोर, नेते जेडीयू


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prashant kishor partys admission By Amit Shahs advice