पोलिस बहिणींना म्हणाला, खरं सांगा नाहीतर काढा कपडे...

वृत्तसंस्था
Wednesday, 18 September 2019

पोलिसांनी आम्हा तिघी बहिणींना पोलिस चौकीमध्ये कपडे काढण्यास सांगितले. आम्ही नकार दिला. अखेर तिघींना नग्न करून...

गुवाहटी (आसाम): पोलिसांनी आम्हा तिघी बहिणींना पोलिस चौकीमध्ये कपडे काढण्यास सांगितले. आम्ही नकार दिला. अखेर तिघींना नग्न करून पोलिसांनी छळ केला, अशी तक्रार गर्भवती महिलेने प्रसारमाध्यमांसोर केली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना महिला म्हणाली, 'आमचा भाऊ एका युवतीला घेऊन पळून गेला आहे. तिच्या कुटुंबियांनी अपहरणाची तक्रार दाखल केली. पोलिसांनी आम्हा तिघी बहिणींना तपासासाठी ताब्यात घेतले. परंतु, भाऊ कोठे पळून गेला आहे, याबद्दलची काहीच माहिती आम्हाला नव्हती. पोलिसांनी चौकीमध्ये आमचा छळ सुरू केला. मी, गर्भवती असतानाही मला व माझ्या दोन बहिणींना कपडे काढण्यास सांगितले. आम्ही नकार दिल्यानंतर आम्हाला नग्न करून छळ करण्यात आला. पोलिसांच्या छळामुळे माझा गर्भपात झाला आहे. शिवाय, याबद्दलची कोणतीही माहिती बाहेर न सांगण्याची धमकी पोलिसांनी दिली होती.'

पोलिस अधिकारी कुलाधार सैकिया म्हणाले, 'महिलेने केलेल्या तक्रारीनंतर चौकशी करण्यात आली आहे. चौकशीनंतर पोलिस उपनिरीक्षक महेंद्र सरमा व बिनिता बोरो यांना निलंबित करण्यात आले आहे.'

दारांगचे पोलिस अधीक्षक अमृत भूयान म्हणाले, 'महिलेने केलेल्या आरोपाची वरिष्ठ अधिकाऱयाकडून चौकशी केली जाईल. महिलेचा वैद्यकीय अहवाल हाती येण्याची वाट पाहात आहोत.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pregnant woman and two sisters stripped, tortured inside Assam police station