भारतात लसीकरण कधी होणार सुरु? आरोग्य सचिवांनी दिली माहिती

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 5 January 2021

देशातील दोन कोरोना लशींच्या आपत्कालीन वापराला मंजुरी मिळाल्यानंतर लसीकरणाची जोरदार तयारी सुरु झाली आहे.

नवी दिल्ली- देशातील दोन कोरोना लशींच्या आपत्कालीन वापराला मंजुरी मिळाल्यानंतर लसीकरणाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात 13 जानेवारीपासून लसीकरण सुरु केले जाऊ शकते. आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेत सांगितलं की देशामध्ये 41 पेक्षा अधिक वॅक्सिन स्टोर आहेत. आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना कोविन (Cowin) ऍपवर रेजिस्ट्रेशन करण्याची गरज नाहीय. त्यांची माहिती पूर्वीपासूनच सरकारकडे आहे. 

अन्य लोकांना कोरोनाची लस घेण्यासाठी कोविन ऍपवर रेजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. या ऍपद्वारे यूनिक हेल्थ ID generate तयार केली जाऊ शकते. लस घेतल्यानंतर एक QR सर्टिफिकेट मिळेल. जर कोणता देश कोविन ऍप वापरु इच्छित असेल तर भारत सरकार त्यासाठी मदत करेल, असं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. 

पत्रकार परिषदेमध्ये आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी स्पष्ट केलं की, कोणत्याही लशीच्या निर्यातीवर बंधनं आणण्यात आलेले नाहीत. 3 तारखेला ड्रग कंट्रोलर अँड जनरल ऑफ इंडियाने लशीच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली होती. त्यानंतरच्या 10 दिवसांमध्ये लसीकरणाची प्रक्रिया सुरु होईल. 

आरोग्य सचिवांनी सांगितलं की, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 2.5 लाखांपेक्षा कमी झाली आहे, सहा महिन्यानंतर असं झालं आहे. 23 डिसेंबर ते 5 जानेवारीपर्यंत संक्रमण दर 3 टक्क्यांच्या खाली राहिला आहे. 21 सप्टेंबरला 10 लाख सक्रिय रुग्ण होते, 2 जानेवारी 2.5 लाख रुग्ण आहेत. यातील 44 टक्के रुग्ण रुग्णालयात असून 56 टक्के होम आयसोलेशनमध्ये आहेत. 

दरम्यान, नव्या वर्षाच्या सुरुवातीला भारताला दोन आनंदाच्या बातम्या मिळाल्या. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी द्यावी अशी शिफारस कोरोना लशीसंबंधी तज्ज्ञ समितीने केली होती. त्यानंतर 3 जानेवारीला भारताच्या डीसीजीआयने लशीला मंजुरी दिली. याकाळात भारतात लशीकरणाची रंगीम तालीम घेण्यात आली आहे. आता 13 जानेवारीपासून देशातील कोरोना वॉरियर्संना लस दिली जाण्याची शक्यता आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prepared to roll out vaccine within 10 days Union Health Secretary Rajesh Bhushan