
नवी दिल्ली : ‘‘आर्थिक क्षेत्रात भारताचे कर्तृत्व ठळकपणे दिसणारे आहे. मागील आर्थिक वर्षातला जीडीपी वाढीचा दर ६.५ टक्के असून, भारत जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे,’’ अशा शब्दांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय अर्थव्यवस्थेची सक्षमता अधोरेखित केली. यासोबतच, राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न येतो तेव्हा आपले सैन्य कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास पूर्णपणे सक्षम आहे हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने दाखवून दिले असल्याचे प्रतिपादन करत राष्ट्रपतींनी भारताने दहशतवादाला निर्णायक प्रत्युत्तर दिल्याचेही ठणकावून सांगितले.