
Presidential Election 2022 : आज मतदान, मुर्मू यांचे पारडे जड
Presidential Election 2022 News in Marathi
नवी दिल्ली : देशातील सर्वोच्च पद असलेल्या राष्ट्रपती पदासाठी आज (ता. १८) निवडणूक होणार आहे. सत्ताधारी ‘एनडीए’च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधकांचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यात थेट लढत आहे. निवडणुकीत साठ टक्क्यांहून अधिक मतांची बेगमी केलेल्या द्रौपदी मुर्मू यांना आणखी वाढीव मते मिळवून देण्याची सत्ताधारी भाजपची रणनीती असल्याचे समजते. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांमधील ७७६ खासदार आणि देशभरातील सर्व विधानसभांचे ४०३३ आमदार असे एकूण ४८०९ मतदार उद्या मतदान करतील. त्यापार्श्वभूमीवर विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून उमेदवारांना सद्सद्विवेकबुद्धीनुसार मतदान करण्याचे आवाहन केले आहे. (Droupadi Murmu Vs Yashwant Sinha)
हेही वाचा: उपराष्ट्रपती निवडणुकीचे वेगळेपण व वैशिष्ट्ये
राष्ट्रपती पदाची निवडणूक दोन व्यक्तींमधील नव्हे, तर दोन विचारसरणींमधील असल्याचे यशवंत सिन्हा यांनी यात म्हटले आहे. आपला पक्ष घटनेतील मूल्यांचे रक्षण करणारा असल्याने सर्व खासदार आणि आमदारांनी संविधान तसेच सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून मतदान करावे, असेही आवाहन त्यांनी केले. यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देणाऱ्या पक्षांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष, समाजवादी पक्ष, राष्ट्रीय लोकदल, तेलंगण राष्ट्र समिती, द्रमुक, राष्ट्रीय जनता दल यासारख्या पक्षांचा समावेश आहे. तर, सुरूवातीला त्यांना पाठिंबा देणाऱ्या झारखंड मुक्ती मोर्चाने आयत्यावेळी द्रौपदी मुर्मू यांना समर्थन जाहीर केले. राष्ट्रपती निवडणुकीत मतदारांच्या मताचे मूल्य लोकसंख्येच्या आधारे ठरते. या निवडणुकीसाठी १९७१ ची जनगणना ग्राह्य धरण्यात आली आहे.
हेही वाचा: ...अशी होते राष्ट्रपतींची निवडणूक
मुर्मू यांचे पारडे जड
सत्ताधारी ‘एनडीए’कडे एकूण ४४८ खासदार आणि १७७३ आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्या मतांचे मूल्य ५,३२,१३९ एवढे झाले असून द्रौपदी मुर्मू यांना विजयासाठी केवळ ११,०७७ मतांची आवश्यकता असताना एआयडीएमके, ओडिशामधील सत्ताधारी बिजू जनता दल आणि आंध्र प्रदेशातील सत्ताधारी वायएसआर काँग्रेसने त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. झारखंड मुक्ती मोर्चा आणि शिवसेनेनेही द्रौपदी मुर्मू यांना मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, तेलुगू देसम पक्ष, बहुजन समाज पक्ष, धर्मनिरपेक्ष जनता दल, शिरोमणी अकाली दलाने तसेच उत्तर प्रदेशातील सुहेलदेव पक्षाने दिलेल्या पाठिंब्यानंतर द्रौपदी मुर्मू यांच्याकडील मते ६१ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहेत.
एकूण मतांचे मूल्य - १०,८६, ४३१
विजयासाठी आवश्यक - ५,४३,२१६ +
ही निवडणूक दोन व्यक्तींमध्ये नसून दोन विचारधारांमध्ये आहे. मी सर्व लोकप्रतिनिधींना विनंती करतो की त्यांनी आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकून मतदान करावे.
-यशवंत सिन्हा, यूपीएचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार
Web Title: Presidential Election Live Updates Droupadi Murmu Nda Yashwant Sinha Voting Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..