राष्ट्रपती निवडणूक : द्रौपदी मुर्मू विरुद्ध यशवंत सिन्हा दुरंगी लढत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Presidential Election yashwant sinha against draupadi murmu bjp

राष्ट्रपती निवडणूक : द्रौपदी मुर्मू विरुद्ध यशवंत सिन्हा दुरंगी लढत

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आलेल्या तब्बल ७२ जणांच्या ८७ उमेदवारी अर्जांपैकी छाननीनंतर ७० जणांचे अर्ज बाद झाले आहेत. यामुळे अंतिम लढत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा या दोघांमध्येच होणार असल्याचे आज औपचारिकरीत्या स्पष्ट झाले. तब्बल १६ राज्यांमधून उमेदवारी अर्ज आले होते. त्यातील १४ अर्ज महाराष्ट्रातून आले होते.

अर्जांची आज छाननी झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी आणि राज्यसभेचे ‘सेक्रेटरी जनरल'' पी. सी. मोदी यांनी गुरुवारी ही घोषणा केली. देशाच्या सर्वोच्च पदासाठी होणाऱ्या या निवडणुकीत ३१८ इच्छुकांनी प्रत्यक्ष येऊन उमेदवारी अर्ज घेतले. तर ११ जणांनी टपालाद्वारे अर्ज मागितले होते. यातील आठ जणांनी टपालाद्वारे अर्ज राज्यसभा सचिवालयाकडे पाठविले. उमेदवारी अर्ज प्रत्यक्ष येऊन भरण्याचा निकष असल्याने हे आठही अर्ज आपोआप बाद झाले होते. तर, २८ जणांचे अर्ज मतदार यादीत नाव असल्याचे अधिकृत प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे बाद ठरले. याशिवाय प्रस्तावक आणि अनुमोदकांसह ५० जणांच्या सह्या नसणे, तसेच १५ हजार रुपये अनामत रक्कम न भरणे या सारख्या कारणांमुळे अर्ज बाद होण्याचे प्रमाण जास्त होते.

चार संचांत उमेदवारी अर्ज भरण्याची मुभा असल्याने अंतिमतः देशभरातून आलेल्या ७२ जणांच्या ८७ अर्जांची छाननी झाली. मुर्मू आणि सिन्हा यांचे प्रत्येकी चार संचांतील आठ वगळता उर्वरित सर्वांचे एकूण ७९ अर्ज बाद झाले. निवडणुकीसाठी आलेल्या ११५ अर्जांपैकी सर्वाधिक अर्ज राष्ट्रीय राजधानी दिल्लीतून होते. दिल्लीतून १९ इच्छुकांनी २३ अर्ज भरले. त्याखालोखाल उत्तर प्रदेशातील १६ जणांनी १८ अर्ज भरले. महाराष्ट्रातून ११ जणांनी १४ अर्ज भरले होते. तर तमिळनाडूमधून १० उमेदवारांनी ११ अर्ज दाखल केले. दहा महिलांच्या १४ अर्जांचाही यात समावेश होता. आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये यावेळी उमेदवारी अर्जांची संख्या सर्वाधिक असून एकूण ६२ इच्छुकांनी १५ हजार रुपये अनामत रक्कम भरल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे ९.३० लाख रुपये जमा झाले आहेत. परंतु, अर्ज बाद ठरल्यामुळे या उमेदवारांना अनामत रक्कम परत मिळणार आहे.

एकूण मतदार ४८०९

राष्ट्रपतीपदाची निवडणूक १८ जुलैला होणार असून यात संसदेच्या दोन्ही सभागृहांमधील खासदार आणि देशभरातील सर्व विधानसभांचे आमदार असे एकूण ४८०९ मतदार मतदान करतील. त्यात लोकसभेच्या ५४३, राज्यसभेच्या २३३ अशा एकूण ७७६ खासदारांचा समावेश आहे. दिल्ली आणि पुदुच्चेरी या विधानसभा असलेल्या केंद्रशासित प्रदेशांसह २८ राज्यांमधील ४०३३ आमदारांचा समावेश आहे. प्रत्येक खासदाराच्या एका मताचे ७०० याप्रमाणे एकूण मतमुल्य ५४३२०० एवढे आहे. राज्यांतील लोकसंख्येच्या प्रमाणाच्या आधारे आमदारांच्या मताचे मूल्य ठरविण्याच्या निकषानुसार सर्व ४०३३ आमदारांच्या मतांचे एकत्रित मूल्य ५४३२३१ एवढे आहेत. एकूण मतदारांच्या मतांचे मूल्य १०,८६,४३१ एवढे आहे.

Web Title: Presidential Election Yashwant Sinha Against Draupadi Murmu Bjp

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top