तृणमूल काँग्रेस नेते यशवंत सिन्हांचा राजीनामा; राष्ट्रपतीपदाचा होऊ शकतात उमेदवार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yashwant Sinha

तृणमूल काँग्रेसचे नेते यशवंत सिन्हा यांनी आज पक्ष सोडण्याचा निर्णय जाहीर केलाय.

तृणमूल काँग्रेस नेते यशवंत सिन्हांचा राजीनामा; राष्ट्रपतीपदाचा होऊ शकतात उमेदवार!

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी (Presidential Election) विरोधक आपल्या उमेदवाराबाबत सतत विचारमंथन करत आहे. आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही विरोधी पक्षांची बैठक बोलावली असून, त्यात आगामी राष्ट्रपती निवडणुकीवर चर्चा होणार आहे. आज विरोधक राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची घोषणा करू शकतात, असं मानलं जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून विरोधक वेगवेगळ्या नावांवर चर्चा करत आहेत. यापूर्वी फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांचं नाव पुढं येत होतं. मात्र, फारुख अब्दुल्ला यांनी ते स्वीकारण्यास नकार दिलाय. फारुख अब्दुल्ला यांच्याशिवाय शरद पवार आणि गोपाळकृष्ण गांधी (Gopalkrishna Gandhi) यांच्या नावाचीही विरोधी पक्षात चर्चा झालीय. मात्र, आता विरोधकांकडून राष्ट्रपतीपदाचा उमेदवार म्हणून नवा चेहरा समोर येत आहे. या अहवालावर विश्वास ठेवला, तर विरोधक यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदाचा उमेदवार म्हणून उभं करू शकतात.

त्यातच आता तृणमूल काँग्रेसचे नेते यशवंत सिन्हा यांनी आज (मंगळवार) पक्ष सोडण्याचा निर्णय जाहीर केलाय. त्यामुळं आश्चर्य व्यक्त होत आहे. ते म्हणाले, आता मोठ्या विरोधी एकजुटीच्या व्यापक राष्ट्रीय उद्दिष्टासाठी मला काम करायचं आहे, असं त्यांनी म्हटलंय. आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांचं संयुक्त विरोधी उमेदवार म्हणून नाव देतील, अशी अटकळ अनेक दिवसांपासून होती. खुद्द यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांनी एक ट्विट करून याकडं लक्ष वेधलं होतं. यशवंत सिन्हा यांनी ट्विट करून लिहिलं की, 'तृणमूल काँग्रेसमध्ये मला सन्मान आणि प्रतिष्ठा दिल्याबद्दल मी ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा आभारी आहे. आता माझ्यावर पक्षापासून फारकत घेऊन मोठ्या राष्ट्रीय हेतूसाठी, विरोधी ऐक्यासाठी काम करण्याची वेळ आलीय. मला खात्री आहे की, ममता बॅनर्जी माझं हे धोरण स्वीकारतील.' या ट्विटनंतर त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय जाहीर केलाय. त्यामुळं तर्कविर्तकांना उधाण आलंय.

दरम्यान, देशात 18 जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांची आज (मंगळवार) दिल्लीत बैठक होत आहे. माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी मंगळवारी सकाळी एक ट्विट पोस्ट केलीय, त्यामुळं 18 जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी उमेदवार म्हणून त्यांचा विचार केला जाऊ शकतो, असा अंदाज बांधला जात आहे.