यशवंत सिन्हा यांच्यावर भाजपकडून टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yashwant sinha

यशवंत सिन्हा यांच्यावर भाजपकडून टीका

बंगळूर : राष्ट्रपतिपद निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग येत आहे. रबर स्टॅम्प राष्ट्रपती नको असे वक्तव्य केल्याबद्दल विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा यांना सत्ताधारी भाजपने धारेवर धरले. आदिवासी महिला या पदासाठी सक्षम नाही अशी भावना सिन्हा यांचा दृष्टिकोन तिरस्काराचा असल्याचे दर्शविते, असे प्रत्युत्तर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी यांनी दिले. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) उमेदवार द्रौपदी मुर्मू या ओदीशामधील आदिवासी समाजाच्या आहेत. सिन्हा यांनी कर्नाटकमध्ये प्रचाराच्यावेळी हे वक्तव्य केले होते. याविषयी रवी म्हणाले की, देशाला रबर स्टॅम्प राष्ट्रपती नक्कीच नको आहे, पण आपणच या योग्यतेचे आहोत अशी भावना सुद्धा धोकादायक आहे.

केंद्रातील सत्ताधारी भाजप राजकीय प्रतिस्पर्ध्यांना अडकविण्यासाठी तपास यंत्रणांचा गैरवापर करीत असल्याचा आरोप सिन्हा यांनी केला होता. याबाबत रवी म्हणाले की, जे प्रामाणिक आहेत त्यांच्याविरुद्ध ईडी (सक्तवसुली संचालनालय) किंवा प्राप्तिकर खाते काहीही करू शकत नाही, पण जे भ्रष्ट आहेत ते सुटू शकणार नाहीत. मतमुल्यांची सध्याची स्थिती बघता मुर्मू यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास रवी यांनी व्यक्त केला. मुर्मू दहा जुलै रोजी कर्नाटकचा दौरा करणार आहेत. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील धर्मनिरपेक्ष जनता दलाने (जेडीएस) मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे सूतोवाच केले आहे. या भूमिकेचे रवी यांनी स्वागत केले.

द्रौपदी मुर्मू यांनी झारखंडच्या राज्यपाल, ओडिशाच्या आमदार, महाविद्यालयातील व्याख्याता अशा पदांवर काम करताना क्षमता सिद्ध केली आहे. सिन्हा यांचा असा दृष्टिकोन कर्तबगार आदिवासी महिलेविषयी अपप्रचार करणारा आहे.

- सी. टी. रवी, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते

Web Title: Presidential Elections Did Not Want Rubber Stamp President Criticize Yashwant Sinha From Bjp

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..