विरोधकांच्या बैठकीआधीच ममता बॅनर्जी आणि शरद पवारांची भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी
 राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

विरोधकांच्या बैठकीआधीच ममता बॅनर्जी आणि शरद पवारांची भेट

मुंबई : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी दिल्लीमध्ये विरोधकांनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज राजधानीमध्ये पोचताच ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. या वेळी प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते.

खुद्द पवार यांनीच ही निवडणूक लढवावी अशी विनंती तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आली; पण मला आणखी काही काळ राजकारणामध्ये सक्रिय राहायचे असल्याचे सांगत पवार यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. तत्पूर्वी सकाळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डी. राजा यांनीही पवार यांची भेट घेतली. दुसरीकडे पवार यांनी मात्र राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढविण्यास नकार दिला असल्याची माहिती येचुरी यांनी दिली. ‘‘ पवार हे जनसामान्यांमध्ये असणारे आणि त्यांच्यात रमणारे नेते आहेत त्यांच्याकडे राष्ट्रपतिपदाची जबाबदारी देणे, हे त्यांना कितपत पटेल हे माहिती नाही. मात्र याबाबतचा निर्णय स्वतः पवार आणि पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील.’’ अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. राष्ट्रपतिपदासाठी विरोधकांकडून संयुक्त उमदेवार देण्याची चाचपणी सुरू आहे त्यासाठी उद्या ( ता.१५) रोजी प्रमुख विरोधी पक्षांची बैठक होणार असून या बैठकीला डाव्या पक्षांचे खासदार आणि काँग्रेसचे नेते देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

शरद पवार यांनी राष्ट्रपतिपदासाठी विरोधकांचा उमेदवार व्हायला नकार दिला असल्याचे सीताराम येचुरी यांनी सांगितले. सध्या अन्य नावांवर विरोधकांकडून चर्चा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान उद्याच्या बैठकीला केवळ डाव्या पक्षाचे खासदार उपस्थित राहतील, येचुरी किंवा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे डी. राजा हे उपस्थित राहणार नाहीत. काँग्रेसकडून या बैठकीमध्ये मल्लिकार्जुन खर्गे, जयराम रमेश आणि रणदीप सुरजेवाला हे सहभागी होऊ शकतात. उद्या येथील ‘कॉन्स्टिट्यूशन क्लब’मध्ये ही बैठक होणार आहे.

राष्ट्रपतिपदासाठी पवार उत्तमच : राऊत

अयोध्या ः ‘‘ देशाला राष्ट्रपती हवा असेल तर शरद पवार हे उत्तम व्यक्ती आहेत, जर रबर स्टॅम्प हवा असेल तर आणखी खूप जण आहेत. शरद पवार हे देशातील मोठे नेते आहेत. त्यांच्याकडे सर्वाधिक अनुभव आहे. कोणतीही राजकीय त्रुटी निर्माण झाली तर आम्ही त्यांच्याकडे सल्ला घेण्यासाठी जातो. दिल्लीत उद्या (ता.१५) ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत एक बैठक होत आहे, त्यात सर्व विरोधी पक्षांना बोलाविण्यात आले आहे. शरद पवारदेखील त्यात सहभागी होतील. उद्याच्या बैठकीत राष्ट्रपतिपदाबाबतची रणनीती ठरवली जाईल,’’ अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली.

Web Title: Presidential Elections Mamata Banerjee Meets Ncp Chief Sharad Pawar In Delhi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top