
देशात गेल्या 9 दिवसांपासून सलगपणे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ होत आहे.
नवी दिल्ली : देशात गेल्या 9 दिवसांपासून सलगपणे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ होत आहे. यावरुन देशातील जनसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. जवळपास शंभरी गाठलेल्या या किंमतींमुळे सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. देशात यावरुन मोदी सरकारवर टीकेची झोड उठत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींवरुन काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी काल संध्याकाळी योग गुरु रामदेव बाबा यांच्यावरील एका कार्टूनच्या आधारे केंद्र सरकारवर कठोर टीका केली आहे.
If you took yoga lessons from BabaRamdev, you too could see petrol prices at 06 rupees a litre! pic.twitter.com/zatuS6t6cs
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) February 16, 2021
या कार्टूनमध्ये रामदेव बाबा एका पेट्रोल पंपासमोर शीर्षासन करताना दिसत आहेत. तसेच त्यांच्या समोर पेट्रोलच्या किंमतीचा बोर्ड दिसत आहे. त्यावर 90 रुपये लिटर असं लिहण्यात आलं आहे. या कार्टूनच्या खाली मल्याळम भाषेत एक कॅप्शन देखील आहे ज्याचा अनुवाद करत थरुर यांनी आपलं ट्विट पोस्ट केलं आहे. त्यांनी म्हटलंय की, जर तुम्ही बाबा रामदेव यांच्याकडून योग शिकून घेतला तर आपल्याला देखील पेट्रोलच्या किंमती 06 रुपये लिटर दिसून येतील.
हेही वाचा - पेट्रोलच्या शतकाला अवघ्या चार धावा कमी; सलग 9 व्या दिवशी देशात इंधन दरवाढ
सरकारी तेल कंपन्यांकडून आज सलग नवव्या दिवशी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. यावेळच्या वाढींना वेगळं महत्त्व आहे कारण या वाढीसह प्रत्येकवेळी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती नवा उच्चांक गाठत आहेत. आज देखील डिझेलच्या किंमतीमध्ये 24 ते 26 पैशांनी वाढ झाली आहे. तर पेट्रोलच्या किंमतींमध्ये 23 ते 25 पैशांनी वाढ झाली आहे. मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये देखील प्रीमियम पेट्रोल 14 फेब्रुवारी रोजी 100 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.
प्रमुख शहरांमध्ये काय आहे किंमत?
शहर डिझेल पेट्रोल
दिल्ली 79.95 89.54
कोलकाता 83.54 90.78
मुंबई 86.98 96.00
चेन्नई 85.01 91.68