"पंतप्रधान मोदी यांचं लॉकडाऊनचं नियोजन चुकलंच"

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 16 August 2020

भारताने 25 मार्च रोजी चार तासांचा अवधी देत देशात टाळेबंदी लागू करत असल्याचं जाहीर केलं.

नवी दिल्ली- भारताने खूप लवकर लॉकडाऊन (lock down) जाहीर केला आणि लवकरच त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अपेक्षेपेक्षा परिस्थिती फार बिघडली आहे, असं वक्तव्य अर्थतज्ज्ञ आणि नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी (Abhijit Banerjee) म्हणाले आहेत. भारतात कोरोनाबाधितांचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर बॅनर्जी यांचे वक्तव्य आलं आहे. 'लाईव्ह मिंट'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

coronavirus updates: देशात सलग 8 दिवस आढळले 60 हजारांपेक्षा अधिक रुग्ण! 

भारताने 25 मार्च रोजी चार तासांचा अवधी देत देशात टाळेबंदी लागू करत असल्याचं जाहीर केलं. लॉकडाऊन जाहीर करताना सरकारने कोणताही अभ्यास केला नाही. देशात किती स्थलांतरित मजूर आहेत, याबाबतची कोणतीही आकडेवारी सरकारकडे नव्हते. त्यामुळे मजुरांचे प्रचंड हाल झाले. शास्त्रीयदृष्या माहिती उपलब्ध नसल्याने सरकारने निर्णय घेण्यात चूक केली. त्याचे परिणाम आपल्याला कोरोना काळात दिसून आले, असं बॅनर्जी म्हणाले आहेत. 

लॉकडाऊन हा कोणताही अभ्यास न करता जाहीर करण्यात आला. हा निर्णय आपण खूप घाईत घेतला. आपण खूप वेळ लोकांना बंदिस्त करु शकत नाही. त्यामुळे आपण लवकरच लॉकडाऊन उठवला. लॉकडाऊनचं नियोजन चुकलं आहे. यामुळे वाईट परिस्थिती निर्माण झाली असल्याचं बॅनर्जी म्हणाले आहेत. 

मागील सरकारांनी स्थलांतरित मजुरांची माहिती ठेवण्यासाठी कोणतेही प्रभावी प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे स्थलांतरित मंजुरांचा प्रश्न गंभीर बनला. स्थलांतरितांनी कुठे राहायचं हा प्रश्न निर्माण झाला. अनेक मजूर बांधकामाच्या ठिकाणी राहायचे. सर्व काही बंद झाल्याने त्यांच्या राहण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे स्थलांतरित मजुरांची माहिती ठेवणे आवश्यक होते, असं ते म्हणाले. 

देशाची लोकसंख्या 2 कोटी 38 लाख; कोरोना रुग्ण फक्त 481

भारतातून खूप कमी माहिती बाहेर येत आहे, असं बॅनर्जी म्हणाले. माजी आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यम यांचे जून महिन्यांतील निरीक्षण नोंदवताना ते म्हणाले की, भारताच्या आर्थिक वाढीबाबत मी साशंक आहे. कारण 2011-12 ते 2016-17 दरम्यान आर्थिक वाढ मोजण्याच्या पद्धतीत मोठा बदल करण्यात आला आहे. 

दरम्यान, भारतात कोरोना महामारीने हाहाकार माजवला आहे. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे नवीन  63,986 रुग्ण सापडल्याने रुग्णांचा आकडा 25,89,208 पर्यंत पोहचला आहे. भारत जगातील  सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या देशांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. शनिवारी एका दिवसात देशात  कोरोनाच्या 950 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे भारतातील एकूण कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा 50 हजारांच्या वर गेला आहे. 

(edited by-kartik pujari)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prime Minister Modi's lockdown plan was wrong