संघाच्या बांधणीत मा. गो. वैद्यांचे मोठे योगदान; मोदींनी वाहिली श्रद्धांजली

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 19 December 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रवक्ते मा. गो. वैद्य यांच्या निधनानंतर श्रद्धांजली वाहिली.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रवक्ते मा. गो. वैद्य यांच्या निधनानंतर श्रद्धांजली वाहिली. मा. गो. वैद्य हे एक प्रतिष्ठित लेखक आणि पत्रकार होते. वैद्य यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी दशकांपासून महत्वाचे योगदान दिले आहे. त्यांनी भारतीय जनता पक्षाला मजबूत करण्यासाठीही काम केले असल्याचं मोदी म्हणाले. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.   

राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि विधानपरिषदेचे माजी सदस्य बाबुराव उपाख्य मा. गो. वैद्य यांचं आज दुपारी ३.३० वाजता वृद्धपकाळानं निधन झालं. ते ९८ वर्षांचे होते. वैद्य हे विचारवंत पत्रकार, हिंदुत्वाचे भाष्यकार, तरुण भारतचे माजी मुख्य संपादक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी बौद्धिक आणि प्रचार प्रमुख होते. संघाचे सह सरकार्यवाह श्री. मनमोहन वैद्य यांचे ते वडील होते. तसेच १९७८ साली ते विधानपरिषदेचे सदस्यही होते. 

१९६६ पासून पुढे अनेक वर्षे पत्रकारिता करताना अनेक उत्कृष्ट अग्रलेख, विविध विषयांवर भाष्य लिहिणार्‍या मा. गो. वैद्यांना पत्रकारिता व समाजसेवेचे अनेक पुरस्कार मिळाले. आणीबाणीचा काळ व त्या वेळच्या अडचणी आणि त्यातून काढलेले मार्ग हा मा.गो. वैद्य याच्या संपादकीय कारकिर्दीतल्या कायम आठवणीत असणारा काळ होता.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prime Minister Narendra Modi condoles the death of RSS idealogue MG Vaidya