पंतप्रधान मोदी बोलले.. पण पराभवाचा उल्लेख टाळला! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

एकीकडे देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या घोडदौडीला लगाम बसत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात भाष्य करणे टाळले.

नवी दिल्ली : एकीकडे देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या घोडदौडीला लगाम बसत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात भाष्य करणे टाळले. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यामध्ये त्यांनी संसद सत्रामध्ये महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची अपेक्षा व्यक्त केली. 

राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या महत्त्वाच्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता होती. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची मदार या 'हिंदी' भाषिक राज्यांवर आहे. त्यामुळे पाचपैकी निदान तीन राज्यांमध्ये विजय मिळविणे भाजपसाठी आवश्‍यक होते. या पराभवाच्या शक्‍यतेमुळे कॉंग्रेस आणि विरोधी पक्षांच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. 

या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी संसदेबाहेर पत्रकारांशी संवाद साधला. मोदी म्हणाले, "हे सत्र महत्त्वाचे आहे. जनहितासाठी आणि देशहितासाठी काही महत्त्वाची पावले सरकार या अधिवेशनात उचलणार आहे. सगळ्याच विषयांवर खुलेपणाने चर्चा व्हावी, अशी आमची अपेक्षा आहे. वाद असो वा विवाद, संवाद असायला हवाच. त्यामुळे यंदाच्या सत्रामध्ये नियोजित वेळेपेक्षाही अधिक काम होईल, अशी अपेक्षा आहे. मे महिन्यामध्ये सर्वच राजकीय पक्ष परीक्षेला सामोरे जाणार आहेत. त्यामुळे या सत्राचा उपयोग करून अधिकाधिक जनहिताची कामे करावे, असे आवाहन आहे.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prime Minister Narendra Modi denied to talk on election results