PM मोदींनी स्विकारलं G-7 संमेलनाचं आमंत्रण; ब्रिटनचे PM जॉनसन येणार भारतात

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 17 January 2021

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना G-7 शिखर संमेलनासाठी अतिथी म्हणून आमंत्रित केलं आहे.

नवी दिल्ली :  ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना G-7 शिखर संमेलनासाठी अतिथी म्हणून आमंत्रित केलं आहे. G-7 शिखर संमेलन यावेळी कॉर्नवॉलमध्ये जून महिन्यात आयोजित होणार आहे. 

बोरिस जॉनसन यांनी यावेळी म्हटलंय की, G-7 शिखर संमेलनाच्या आधी ते भारताचा दौरा करणार आहेत. त्यांनी पुढे म्हटलंय की, 'जगासाठी फार्मसी'च्या  (pharmacy of the world) स्वरुपात भारत आधीपासूनच जगातील 50 टक्क्याहून अधिक लशीच्या मागणीचा पुरवठा करतो. ब्रिटन आणि भारताने कोरोना सारख्या महासंकटादरम्यान एकत्र येत मिळून काम केलं आहे. 

यावर्षीच्या भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभासाठी बोरिस जॉनसन यांना मुख्य अतिथी म्हणून आमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र, ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्यानंतर कोरोनाच्या प्रादुर्भावात अचानकच मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. या साऱ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर बोरिस जॉनसन यांनी 26 जानेवारी रोजीचा आपला नियोजित दौरा रद्द केला होता.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prime Minister Narendra Modi UK Prime Minister Boris Johnson United Kingdom G7 summit June 2021