Diwali Festival : कैद्यांनी धरला नवनिर्मितीचा मार्ग; तयार केल्‍या दिवाळीच्‍या वस्‍तू

तेजश्री कुंभार 
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

- महानिरीक्षक हेमंत कुमार यांची संकल्‍पना सत्‍यात 

पणजी : कधीकधी क्षणाचा राग आयुष्यभरासाठीची शिक्षा होते. तुरुंगाच्‍या चार बंदिस्‍त भिंतीच्‍या आत राहणारे काही कैदी केवळ दिवस मोजत आयुष्‍य घालवत असतात, तर काही लोक वाळवंटातही नंदनवन फुलविण्‍यासाठी प्रयत्‍नरत असतात. भूतकाळातील चुकांची शिक्षा भोगताना नवनिर्मिती आणि योग्‍य मार्गदर्शकाचा हात धरून विविध वस्‍तू तयार करण्‍याचे काम कोलवाळ (बार्देश) येथील तुरुंगातील कैदी करीत आहेत.

चित्रकाम, फर्निचरचे काम, हस्‍तकलात्‍मक वस्‍तूंसह येथील कैद्यांनी खास दिवाळीसाठी आकाशकंदील, मेणबत्‍या आणि पणत्‍याही तयार केल्‍या आहेत. कामांच्‍या बाबतीत एकमेकांना साथ देत हे कैदी जणू ‘अरे पुन्‍हा आयुष्‍याच्‍या पेटवा मशाली..!’ असा संदेश देत आहेत. 

कैद्यांनी तयार केलेल्‍या दिवाळीच्‍या वस्‍तूंमध्‍ये टाकाउपासून टिकावू वस्‍तूंपासून आकाशकंदील बनविले आहेत. जुन्‍या वृत्तपत्रांचा आणि विविध वस्‍तूंचा वापर करून येथील कैद्यांनी लक्षवेधक आकाशकंदील तयार केले आहेत. विविध रंगांच्‍या कागदाचा वापर करूनही रंगीबेरंगी आकशकंदील तयार करण्‍यात आले आहेत. सुंदर आकाराच्‍या मेणबत्‍यांचाही या व‍स्‍तूंमध्‍ये समावेश आहे. लाकडांपासून तयार करण्‍यात आलेल्‍या वस्‍तूंमध्‍ये अतिशय नाजूक कलाकुसरीने तयार केलेल्‍या मंदिरांचाही समावेश आहे. 

कैद्यांना शिक्षण, प्रशिक्षण 
कोलवाळ येथील तुरुंगात सुमारे १०० कैदी आहेत, तसेच येथे वेगवेगळे प्रशिक्षण देण्‍यासाठी खास प्रशिक्षकही येतात. विविध सरकारी खाती तसेच पोलिस खात्‍यामध्‍ये या वस्‍तू विकल्‍या जातात. याशिवाय कोलवाळ कारागृहातही या वस्‍तू उपलब्ध आहेत. ज्‍यांना या वस्‍तू विकत घेऊन कैद्यांच्‍या सर्जनशीलतेचे कौतुक करायचे आहे, त्‍यांनी कोलवाळ कारागृहाला भेट द्यावी. या वस्‍तू विकून मिळालेले पैसे सरकारी तिजोरीत जमा होतात. गुन्‍हेगारीच्‍या जगतातून नवीन आयुष्‍य जगू पाहणाऱ्या या हातांना त्‍यांच्‍या वस्‍तू विकत घेऊन प्रोत्‍साहन देणारे हातही या समाजात असल्‍याची माहिती येथे मिळाली. 

महानिरीक्षक हेमंत कुमार यांची संकल्‍पना सत्‍यात 
जेव्‍हापासून कोलवाळ कारागृहात महानिरीक्षकपदी हेमंत कुमार हे दाखल झाले, तेव्‍हापासून येथे अनेक चांगले बदल घडून येत आहेत. शिस्‍त आणि वेळेचे महत्त्‍वही ‘आयजी साहेब’ कैद्यांना अत्‍यंत चांगल्‍या पद्धतीने समजून सांगत असल्‍याने येथील कैदी नम्र झाले असून अधिकाधिक कष्‍ट करण्‍यावर ते भर देत आहेत. वेगवेगळ्या वस्‍तू तयार करण्‍यासाठीची संकल्‍पनाही त्‍यांचीच आहे. शिवाय त्‍यांनी दिलेल्‍या मार्गदर्शनामुळे कारागृहातील भिंतीवर कैद्यांनी काढलेली वेगवेगळी चित्रे पहायला मिळतात. गेल्‍या दोन महिन्‍यांपासून दररोज सकाळी साफसफाई करण्‍याचे काम आळीपाळीने ६० कैदी करीत असल्‍याची माहिती येथील सहाय्‍यक पर्यवेक्षक भानूदास पेडणेकर यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prisoners have created new diwali items in kolwal goa