भारताची शस्त्रसज्जता! अमेरिकेकडून अत्याधुनिक विमान खरेदीची प्रक्रिया सुरु 

कार्तिक पुजारी
शनिवार, 25 जुलै 2020

चीनसोबत निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भारताने शस्त्रास्त्र खरेदी प्रक्रियेला गती दिल्याचं दिसत आहे.

नवी दिल्ली- चीनसोबत निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भारताने शस्त्रास्त्र खरेदी प्रक्रियेला गती दिल्याचं दिसत आहे. भारत अमेरिकेकडून लांब पल्ल्याची टेहळणी क्षमता असलेली ६ पोसेडोन-8I विमाने खरेदी करणार आहे. शिवाय शस्त्रसज्ज असणारे ३० प्रीडेटर-B लष्करी ड्रोन खरेदी करण्याचे विचाराधीन आहे. या विमानांचा लष्करात समावेश झाल्यास भारताची क्षमता वाढणार आहे.  

लष्कराच्या कारवाईला मोठं यश! श्रीनगरमध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा
भारत सध्या मोठ्या प्रमाणात पोसेडोन-8I विमानांचा वापर करत आला आहे. या विमानांमध्ये इलेक्ट्रोनिक सेंसर, शत्रुच्या पाणबुडीचा अचूक वेध घेण्याची क्षमता आहे. शिवाय यावर हार्पोन ब्लॉक मिसाईल आणि एमके-५४ हलक्या वजनाचे टॉरपेडोस देखील आहेत. त्यामुळे या विमानांचा वापर हिंद महासागरात आणि लडाखच्या भागात टेहळणीसाठी फायद्याचा ठरु शकतो.

नौदलाच्या ताफ्यात सध्या ८ पोसेडोन-8I विमाने आहेत. २००९ मध्ये बोईंगने बनवलेल्या पोसेडोन-8I विमानांसाठी २.१ अब्ज डॉलर्सचा करार झाला होता. २००६ मध्ये बोईंगबरोबर १.१ अब्ज डॉलरचा दुसरा एक करार झाला होता. त्याअंतर्गत डिसेंबरपासून ४ विमाने लष्कराच्या ताफ्यात जमा होणार आहेत. त्यानंतर शुक्रवारी सरंक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आणखी सहा पोसेडोन-8I विमाने १.८ अब्ज डॉलर देऊन अमेरिकेकडून खरेदी केले जाणार आहेत. हा करार अमेरिका आणि भारतामध्ये पुढील वर्षाच्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे. 

भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 13 लाखांवर; महाराष्ट्रातील पोलिस..
भारत आणि चीनदरम्यान तब्बल ३४८८ किमोमीटरची सीमा आहे. शिवाय चीनसोबत गेल्या काही वर्षांपासून भारताचे संबंध बिघडत चालले आहेत. अशात सीमा भागात टेहळणीसाठी भारताला अत्याधुनिक विमान आणि ड्रोन यांची आवश्यकता आहे. याच पार्श्वभूमीवर भारताने अमेरिकेकडून ६ पोसेडोन-8I विमाने खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.  भारत अमेरिकेकडून ३० प्रीडेटर ड्रोनही खरेदी करणार आहे. लष्कर, नौदल आणि हवाई दलाला प्रत्येकी १० प्रीडटेर ड्रोन दिले जाणार आहेत. यामुळे सैन्याला समुद्र आणि पाण्यात लक्ष्याचा अचूक वेध घेता येणार आहे. या सर्व खरेदीसाठी ३.५ अब्ज डॉलरचा खर्च येणार आहे. यामुळे करार होण्यासाठी थोडा वेळ लागत असल्याची माहिती आहे. 

२०१८ मध्ये अमेरिकेसोबत झालेल्या COMCASA करारामुळे भारताला त्या देशाकडून अत्याधुनिक शस्त्रास्त्र खरेदी करणे शक्य झालं आहे. त्यामुळे भारत अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणा शस्त्रास्त्र खरेदीचा करार करु लागला आहे. भारताने अमेरिकेसह रशिया, फ्रान्स आणि इस्त्राईलकडूनही मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र खरेदी सुरु केली आहे. त्यामुळे येत्या काळात चीनसोबत निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारत तयारी करत असल्याचं दिसत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The process of purchasing aircraft from the United States begins