New Delhi : परमबीर यांना अटकेपासून संरक्षण; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Parambir Singh
परमबीर यांनाअटकेपासून संरक्षण

परमबीर यांना अटकेपासून संरक्षण; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग हे सध्या भारतातच असून ते फरार झाले नसल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात दिल्यानंतर आज न्यायालयाने त्यांना अटकेपासून संरक्षण देऊ केले. याआधी न्यायालयाने परमबीर यांच्या वकिलांना त्यांच्या स्थानाबाबत विचारणा करत दिलासा देण्यास नकार दिला होता. परमबीर यांच्या वकिलांनी आज न्यायालयात सांगितले की, “ फरार होण्याची अथवा पळून जाण्याची त्यांची इच्छा नाही पण सध्या त्यांच्या जिवाला धोका आहे.

महाराष्ट्रात आल्यास त्यांना मुंबई पोलिसांकडूनच धोका उद् भवू शकतो. ” खंडणीप्रकरणी परमबीर यांच्याविरोधात चार गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. आज परमबीर यांच्या याचिकेवर सुनावणी घेताना न्या. एस. के.कौल आणि न्या. एम.एम.सुंद्रेश यांच्या खंडपीठाने पोलिस महासंचालक संजय पांडे आणि केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) देखील नोटीस बजावली. याप्रकरणी गुरूवारी पार पडलेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने परमबीरसिंग हे कोठे आहेत? अशी विचारणा त्यांच्या वकिलाला केली होती.

महाराष्ट्र सरकारने दोन प्रकरणामध्ये परमबीर यांच्याविरोधात चौकशी सुरू केली असून त्यांना आव्हान देणारी याचिका त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये सादर केली होती पण न्यायालयाने ती फेटाळून लावल्यानंतर परमबीर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणामध्ये हॉटेल व्यावसायिक विमल अग्रवाल यांनी परमबीर आणि निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर खंडणीचे आरोप केले असून यावरून मुंबई पोलिसांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

loading image
go to top