Farm Bill Protest - इंडिया गेटवर ट्रॅक्टर जाळणाऱ्या 5 जणांना घेतलं ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 September 2020

कृषी कायद्याच्या विरोधात सोमवारी सकाळी आंदोलकांनी इंडिया गेटसमोर एका ट्रॅक्टरला आग लावली. अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली.

नवी दिल्ली - कृषी विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शिक्कामोर्तब केल्यानंतर शेतकऱ्यांमधील आंदोलनाचा भडका जास्तच पेटला आहे. कृषी कायद्याच्या विरोधात सोमवारी सकाळी आंदोलकांनी इंडिया गेटसमोर एका ट्रॅक्टरला आग लावली. अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. पंजाब युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी इंडिया गेटवर आंदोलन केलं. यावेळी एका ट्रकमधून ट्रॅक्टर आणून तो इंडिया गेटसमोर जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलं आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 7.15 ते 7.30 च्या दरम्यान जवळपास 15 ते 20 लोक कृषी कायद्याच्या विऱोधात इंडिया गेटजवळ एकत्र आले. त्यांनी सोबत एक जुना ट्रॅक्टर आणला होता. त्या ट्रॅक्टरमध्ये आग लावल्यानतंर जोरदार घोषणाबाजीसुद्धा झाली. 

पोलिसांनी सांगितले की, आंदोलकांकडून काँग्रेस जिंदाबाद अशा घोषणा दिल्या जात होत्या. अग्निशमन दलाने ट्रॅक्टरची आग विझवली. 

देशभरातून कृषी कायद्याला शेतकरी विरोध करत आहेत. विशेषत: पंजाबमधील शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी रेल रोको आंदोलन करत रुळांवरच ठिय्या मांडला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: protest against farm law near india gate delhi