Farmers Protest : आंदोलन होणार आणखी तीव्र; 18 फेब्रुवारीला देशव्यापी 'रेलरोको'

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 11 February 2021

जवळपास गेल्या 70 दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी काल गुरुवारी आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट केली आहे.

नवी दिल्ली : साधारण गेल्या पाच महिन्यांपासून पंजाब आणि हरियाणातील शेतकरी विविध मार्गाने कृषी कायद्यांना विरोध करत आहेत. गेल्या 70 दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलनासाठी बसले आहेत. या 70 दिवसांत अनेक घडामोडी घडल्या मात्र तरीही शेतकऱ्यांचा निर्धार अद्याप तसाच आहे. सरकारकडून हे आंदोलन संपवण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले मात्र, शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असलेले दिसून येत आहेत. जवळपास गेल्या 70 दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी काल गुरुवारी आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट केली आहे. येत्या 18 फेब्रुवारीला देशभरात चार तासांसाठी 'रेलरोको आंदोलन' करण्याची घोषणा केली आहे. केंद्राने पारित केलेले कृषी कायदे हे काळे कायदे असून ते रद्दच केले जावेत, या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले असून आता आंदोलनाची पुढची दिशा ठरवून हा देशव्यापी रोलरोको केला जाणार आहे. 

हेही वाचा - कृषी कायदे पूर्णपणे ऐच्छिक;पंतप्रधान मोदींचा संसदेत पुनरुच्चार

या फेब्रुवारी महिन्यातील आपल्या आंदोलनाची पुढची दिशा संयुक्त किसान मोर्चाने स्पष्ट केली आहे. यावेळी किसान मोर्चाने हेही स्पष्ट केलंय की, 12 फेब्रुवारीला राजस्थानातील सर्व रोड प्लाझा हे टोल फ्री केले जातील.  तसेच 14 फेब्रुवारी रोजी देशभरात पुलवामा हल्ल्यातील शहीद झालेल्यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली वाहण्यासाठी मेणबत्ती तसेच टॉर्च घेऊन 'कँडल मार्च' काढण्याचेही आवाहन संयुक्त किसान मोर्चाच्या दर्शन पाल यांनी केले आहे. 

त्यानंतर दोन दिवसांनी स्वांतत्र्यपूर्व काळातील शेतकरी नेते सर छोटू राम यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात येणार आहे. तर त्यानंतर रेलरोको आंदोलन 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 ते 4 दरम्यान करण्यात येणार आहे. क्रांतीकारी किसान युनियनचे प्रमुख दर्शन पाल यांनी याबाबतची सविस्तर माहिती दिली. 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Protesting farmers announce 4 hour nationwide rail blockade on Feb 18