esakal | 'मास्टरस्ट्रोक!' मोदींच्या कामगिरीची 420 रहस्यं; 56 पानी कोरं पुस्तक प्रकाशित
sakal

बोलून बातमी शोधा

'मास्टरस्ट्रोक!' मोदींच्या कामगिरीची 420 रहस्यं; 56 पानी कोरं पुस्तक प्रकाशित

'मास्टरस्ट्रोक!' मोदींच्या कामगिरीची 420 रहस्यं; 56 पानी कोरं पुस्तक प्रकाशित

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : देशात सध्या कोरोनाचं संकट मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घालताना दिसत आहे. अनेक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होत असून आरोग्य यंत्रणेवर प्रचंड मोठ्या प्रमाणावर ताण आहे. देशातील लोकांमध्ये सध्या असंतोषाचं वातावरण आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यामध्ये मोदी सरकार अयशस्वी ठरत असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने करण्यात येतो आहे. देशात कोरोना संकटाच्या आधीच अर्थव्यवस्थेला उतरती कळा लागली होती. कोरोनाच्या या संकटामुळे अर्थव्यवस्थेवरील हे संकट अधिकच गडद झालं आहे. बेरोजगारी देखील मोठ्या प्रमाणावर वाढली असून कोरोनाच्या या काळात त्यात आणखीनच वाढ होत आहे. मोदी सरकारला येत्या 30 मे रोजी सात वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारच्या कामगिरीवर सध्या मोठ्या प्रमाणावर नाराजीचा सूर उमटताना दिसून येतो आहे. जागतिक माध्यमांमध्ये देखील मोदी सरकारच्या कोरोना काळातील कामगिरीवरुन टीका करण्यात येत असल्याचं चित्र आहे. (Published A Book Called Masterstroke On PM Modis Accomplishments on Amazon)

हेही वाचा: फेसबुकनंतर आता 'गुगल'ही राजी; सरकारचे नियम मान्य

हेही वाचा: रामदेव बाबा अडचणीत, IMA नं पाठवली 1 हजार कोटींची मानहानीची नोटीस

या पार्श्वभूमीवरच मोदी सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडणारं एक पुस्तक ऍमेझॉन या साईटवर उपलब्ध झालं आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून मोदींच्य विरोधकांनी उपहासात्मक पद्धतीने मोदींवर टीका केलीय. “मास्टरस्ट्रोक : ४२० सिक्रेट्स दॅट हेल्पड पीएम इन इंडियाज इम्पॉयमेंट ग्रोथ” असं या पुस्तकाचं नाव आहे. हे पुस्तक अ‍ॅमेझॉनच्या साईटवर अपलोड करणाऱ्याने आपलं स्वत:चं नाव 'बेरोजगार भक्त' असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे हे पुस्तक फक्त 56 पानांचे असून पूर्णपणे कोरे आहे. मोदींच्या 56 इंचाच्या छातीवरुन या पुस्तकाच्या पानांची संख्या देखील 56 ठेवण्यात आली असल्याची शक्यता आहे. या पुस्तकाच्या टायटलमध्ये 'मास्टरस्ट्रोकः 420 रहस्ये ज्यामुळे पंतप्रधानांना भारताच्या रोजगार वाढीस मदत मिळाली' असं म्हटलं आहे. वाचकांना हे पुस्तक मोफत उपलब्ध करुन देण्यात आलं होतं. या पुस्तकाच्या विक्रीसाठी ऍमेझॉनने परवानगी दिली होती. मात्र आता ते पुस्तक ऍमेझॉनच्या साईटवरुन काढून टाकण्यात आलं आहे.

यावर अनेक नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.