esakal | Breaking: पुद्दुचेरीत काँग्रेसने बहुमत गमावले, CM नारायणसामी यांचा राजीनामा
sakal

बोलून बातमी शोधा

narayan sami.jpg

पुद्दुचेरीत काँग्रेस सरकारने सत्ता गमावली आहे. सोमवारी बहुमत चाचणी होणार होती.

Breaking: पुद्दुचेरीत काँग्रेसने बहुमत गमावले, CM नारायणसामी यांचा राजीनामा

sakal_logo
By
सकाळ ऑनलाइन टीम

पुद्दुचेरीः पुद्दुचेरीत काँग्रेस सरकारने सत्ता गमावली आहे. सोमवारी बहुमत चाचणी होणार होती. परंतु, मुख्यमंत्री व्ही नारायणसामी हे त्यापूर्वीच सभागृहातून बाहेर पडले. त्यानंतर पुदुच्चेरी विधानसभा अध्यक्षांनी नारायणसामी सरकारने बहुमत गमावले असल्याची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे त्यांनी सांगितले. 

गेल्या आठवड्यात अनेक आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस सरकार संकटात आले होते. रविवारीही आणखी दोन आमदारांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर नारायणसामी यांच्याकडे केवळ 11 आमदार राहिले होते. तर विरोधकांकडे एकूण 14 आमदार होते. 

पुद्दुचेरीच्या नूतन नायब राज्यपाल तमिलसाई सौंदरराजन यांनी मुख्यमंत्री व्ही नारायणसामी यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले होते. विरोधी पक्षांनी काँग्रेस-द्रमुक आघाडीने बहुमत गमावल्याचा दावा केल्यानंतर राज्यपालांनी हे निर्देश दिले होते. आपल्याकडे बहुमत असल्याचा नारायणसामी यांनी वारंवार दावा केला होता. त्यांनी सभागृहातही बहुमत असल्याचे सांगितले. परंतु, मतदानापूर्वीच त्यांनी सभा त्याग केला. 

दरम्यान, काँग्रेसचे आमदार के. लक्ष्मीनारायणन आणि द्रमुकचे आमदार व्यंकटेशन यांनी रविवारी राजीनामा दिल्यानंतर 33 सदस्यीय विधानसभेत काँग्रेस-द्रमुक आघाडीच्या आमदारांची संख्या घटून 11 झाली आहे. तर विरोधकांकडे 14 आमदार आहेत. 

माजी मंत्री ए नमसिवायम (आता भाजपमध्ये) आणि मल्लाडी कृष्म राव यांच्यासमवेत चार आमदारांनी यापूर्वी राजीनामा दिला होता. तर पक्षाच्या आणखी एका आमदाराला अपात्र जाहीर करण्यात आले होते. नारायणसामी यांचे निकटवर्तीय ए जॉन कुमार यांनीही याच आठवड्यात राजीनामा दिला होता.