
राज्य सरकार अल्पमतात आले असून राज्यात काँग्रेस आमदारांची संख्या केवळ 10 राहिली आहे.
पुद्दुचेरी- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी हे पुद्दुचेरीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. परंतु, त्यांच्या दौऱ्याच्या एक दिवस आधीच तेथील काँग्रेसचे सरकार संकटात आले आहे. राज्यात येत्या एप्रिल-मे महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. सर्वच पक्षांनी यासाठी तयारी सुरु केली आहे. दरम्यान, काँग्रेसचे आमदार ए जॉन कुमार यांनी मंगळवारी आणि आरोग्य मंत्री एम कृष्ण राव यांनी सोमवारी राजीनामा दिला. मागील एक महिन्यात काँग्रेसच्या एकूण 4 आमदारांनी पक्षाचा त्याग केला आहे. अशा पद्धतीने राज्य सरकार अल्पमतात आले असून राज्यात काँग्रेस आमदारांची संख्या केवळ 10 राहिली आहे.
जानेवारी महिन्यात नामाशिवयम यांनी राजीनामा दिला होता. त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रालय होते. तर ई थिपेदन यांनीही राजीनामा दिला होता. थिपदेन हे दिल्लीत जाऊन भाजपत सामील झाले होते. आणखी एक काँग्रेसचे आमदार एन धनावेलू यांना मागील वर्षी जुलै महिन्यात पक्षविरोधी कारवायांमुळे पक्षातून बाहेर काढण्यात आले होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच नायब राज्यपाल किरण बेदी यांच्याविरोधात मुख्यमंत्री नारायण सामी यांनी आंदोलन केले होते. पुद्दुचेरीचे नायब राज्यपालपद स्वीकारल्यापासून किरण बेदी आणि राज्य सरकारमध्ये सातत्याने खटके उडताना दिसतात.
हेही वाचा- उत्तराखंडमध्ये RSS ची मदत; फोटो शेअर केल्यानं परेश रावल ट्रोल
राज्यात वर्ष 2016 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 15 जागांवर विजय मिळाला होता. राज्यात एकूण 30 विधानसभा मतदारसंघ आहेत. काँग्रेस सरकाला डीएमकेचे तीन आणि एका अपक्षाचा पाठिंबा आहे. माजी मुख्यमंत्री एन रंगासामी यांच्या ऑल इंडिया एन आर काँग्रेसकडे सात जागा आहेत. तर एआयएमडीएमकेने चार जागांवर विजय मिळवला होता. भाजपकडे तीन आमदार आहेत.
राहुल गांधी उद्या पुद्दुचेरीत
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी बुधवारी पुद्दुचेरीच्या दौऱ्यावर आहेत. सायंकाळी ते एका रॅलीत भाषण करतील. तमिळनाडूचा त्यांचा दौरा 27 फेब्रुवारीला सुरु होईल. राज्याचे पक्षाचे अध्यक्ष के एस अलागिरी यांनी जनतेला रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा- MP Bus Accident - रस्ता बदलणं पडलं महागात, 42 जणांचे मृतदेह सापडले
पुद्दुचेरीत काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली डीएमके आघाडीत सध्या तणाव आहे. स्थानिक डीएमके नेते तमिळनाडूचे खासदार उद्योजक एस जगराक्षकन हे स्वतःला मुख्यमंत्री पदाचे उमेदवार जाहीर करुन निवडणूक एकट्याने लढवू इच्छितात. त्यावर डीएमके प्रमुख एम के स्टालिन यांनी जगराक्षकन यांना केवळ पक्ष मजबुतीसाठी अतिरिक्त जबाबदारी दिली होती, असे स्पष्ट केले आहे.