esakal | सिद्धूंचा राजीनामा मान्य; मुख्यमंत्र्यांचा सिद्धूंना झटका
sakal

बोलून बातमी शोधा

Navjot Singh Sidhu

पंजाब सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये फेरबदल करून, अनेक मंत्र्यांना नवे विभाग देण्यात आले आहेत. त्यामुळे नवज्योतसिंग सिद्धू यांनीही नव्या मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारायला हवा. सरकार चालविण्यासाठी शिस्त पाळावीच लागते, असे वक्तव्य पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी केले होते. अखेर अमरिंदरसिंग यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. 

सिद्धूंचा राजीनामा मान्य; मुख्यमंत्र्यांचा सिद्धूंना झटका

sakal_logo
By
वृत्तसंस्था

चंडीगड : गेल्या महिन्यात मुख्य खाती काढून घेतलेले पंजाबचे मंत्री आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनी दिलेला राजीनामा अखेर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग मंजूर करत झटका दिला. त्यांनी सिद्धूंचा राजीनामा राज्यपाल विजयसिंह बाडनोर यांच्याकडे पाठविला आहे.

सिद्धू यांनी 10 जूनलाच राजीनाम्याचे पत्र कॉंग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांना लिहिले होते. मात्र, त्यांनी नंतर ते ट्विटरवरून प्रसिद्ध केले होते. मी पंजाबच्या मंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी यामध्ये म्हटले होते. हे पत्र मुख्यमंत्र्यांनाही पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. सहा जूनला सिद्धू यांच्याकडील पर्यटन आणि सांस्कृतिक विकास मंत्रालय काढून त्यांना ऊर्जा मंत्रालय देण्यात आले होते. खाते बदलल्यानंतर सिद्धू यांनी गेले महिनाभर नवीन पदभारही स्वीकारला नव्हता. त्यांना अनेक सरकारी कार्यक्रमांतूनही वगळण्यात येत होते. खाते बदलल्यानंतर सिद्धू यांनी अनेक वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. काही तरी तडजोड होऊन जुने खाते पुन्हा मिळेल अशी त्यांना आशा होती, असे सूत्रांनी सांगितले. मात्र, अमरिंदरसिंग यांच्यापुढे काहीही न चालल्यामुळे अखेर त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. 