
CM चन्नींच्या आरोपांवर PM मोदींनी करुन दिली 'त्या' घटनेची आठवण
चंदीगड : देशात सध्या पाच राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. त्यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांची प्रचारासाठी लगबग सुरु आहे. त्याच आज सकाळी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांच्या हेलिकॉप्टरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव परवानगी नाकारली गेली. त्यामुळं होशियारपूर येथे नियोजित राहुल गांधींच्या सभेला त्यांना पोहोचता आलं नाही, असा आरोप स्वतः चन्नी यांनी केला आहे. चन्नींच्या या आरोपाला स्वतः पंतप्रधान मोदींनी पंजाबमधील एका जाहीर प्रचार सभेत उत्तर दिलं आहे. सन २०१४ मधील अशाच एका घटनेची आठवण त्यांनी यावेळी करुन दिली.
मोदी एका जाहीर सभेत बोलताना म्हणाले, "जे सर्जिकल स्ट्राईकवर सैन्याकडून पुरावा मागत होते. पाकिस्तानच्या सुरात सूर मिसळत होते, या लोकांचं चरित्र मी तुम्हाला सांगतो. सन २०१४ ची लोकसभा निवडणूक होती. मी त्यावेळी गुजरातचा मुख्यमंत्री होतो आणि भाजपनं मला पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित केलं होतं. प्रचारासाठी मी देशभरात फिरत होतो. राज्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या नात्यानं मी तिथलं कामही करत होतो. एक दिवस मला पठाणकोट इथं यायचं होतं इथून हेलिकॉप्टरद्वारे मला हिमाचलच्या दौऱ्यावर जायचं होतं. पण तुम्हला आश्चर्य वाटेल, काँग्रेसचे युवराज म्हणजेच राहुल गांधी हे त्यावेळी त्यांच्या पक्षाचे केवळ खासदार होते. त्यावेळी त्यांचाही अमृतसरजवळ काही कार्यक्रम होता. पण राहुल गांधींमुळं माझ्या विमानाचं उड्डाण रोखण्यात आलं. त्यामुळं मला पाठणकोटला पोहोचण्यास एक ते दीड तास उशीर झाला. जेव्हा पठाणकोटला पोहोचलो तर माझं हेलिकॉप्टर उडी दिलं नाही. यामुळं माझे हिमाचलमधील दोन कार्यक्रम रद्द झाले होते, अशा प्रकारे सत्तेचा दुरुपयोग एका कुटुंबासाठी केला जात होता. आपल्या विरोधकांना रोखणं त्यांना वैताग देणं हे काँग्रेसचे कारनामे राहिले आहेत. काँग्रेसने गेल्या साठ वर्षाच्या सत्ता काळात सर्व विरोधकांना अशाच प्रकारे त्रास दिला आहे.
दरम्यान, सोमवारी सकाळी पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळं मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी होशियारपूरमध्ये राहुल गांधींच्या प्रचार सभेमध्ये सहभागी होऊ शकले नाहीत. चन्नी यांच्या हेलिकॉप्टरला उड्डाणाची परवानगी नाकारली गेली. पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या कारणास्तव पंजाबमध्ये नो फ्लाईंग झोन घोषित करण्यात आला होता. चन्नी यांना चंदीगडवरुन होशियारपूरला जायचं होतं. मात्र, त्यांना जाता आलं नाही. या संपूर्ण घटनाक्रमाची माहिती देताना मुख्यमंत्री चन्नी यांनी आरोप केला की, "राजकारणामुळेच त्यांच्या हेलिकॉप्टरला परवानगी नाकारण्यात आली, अशा प्रकारे विरोधकांना प्रचाराला जाऊ न देणं हे योग्य नाही"