esakal | Punjab : एकाच दगडात दोन पक्षी मारणार काँग्रेस?
sakal

बोलून बातमी शोधा

sidhu and amrindar singh

पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी पदाचा राजीनामा दिल्यानं मोठी खळबळ उडाली. आता काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्षाच्या निवडीसाठी हालचाली सुरु आहेत.

पंजाबमध्ये एकाच दगडात दोन पक्षी मारणार काँग्रेस?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - पंजाब काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या अंतर्गत कलहात गेल्या आठवड्याभरात अनेक घडामोडी घडल्या आहेत. अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर चन्नी यांना मुख्यमंत्री करण्यात आले. त्यानंतर अचानक पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी पदाचा राजीनामा दिल्यानं मोठी खळबळ उडाली. आता काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्षाच्या निवडीसाठी हालचाली सुरु आहेत. आता यात माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या पत्नी परनीत कौर यांचे नाव आघाडीवर आहे. पंजाबच्या पाटियाला मतदारसंघातून त्या लोकसभा खासदार आहेत. सिद्धूंची मनधरणी करण्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते इच्छुक नसल्याचं समजत आहे.

नवज्योत सिंग सिद्धू यांच्या राजीनाम्याने काँग्रेसचे नेते नाराज आहेत. सिद्धूंचा राजीनामा जरी स्वीकारला नसला तरी तो सिद्धूंनी परत घेतला नाही तर त्यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष पदाची माळ दुसऱ्या कोणाच्या तरी गळ्यात पडू शकते. अद्याप तरी काँग्रेसने नव्या प्रदेशाध्यक्षाचे नाव निश्चित केले नसले तरी त्यासाठी हालचाली सुरु आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नीला प्रदेशाध्यक्ष पद दिल्यास कॅप्टन अमरिंदर सिंग यांची नाराजी कमी करण्याचा तो प्रयत्न ठरेल. तसंच सिद्धूंना यामुळे आपोआप बाजुला सारलं जाईल अशी चर्चा आता रंगली आहे.

हेही वाचा: पश्चिम बंगाल पोटनिवडणूक : ममतांची प्रतिष्ठा पणाला, मतदानाला सुरुवात

सध्या प्रदेशाध्यक्षपदासाठी काँग्रेससमोर तीन ते चार नावांचा पर्याय आहे. प्रियांका गांधींचे सल्लागार विभाकर शास्त्री यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांना पक्षातून काढून टाकण्याची मागणी केल्याचंही सांगितलं जात आहे. सध्या तरी सिद्धू आणि काँग्रेसचे दिल्लीतील नेते यांच्यात कोणतीच चर्चा नसल्याचं म्हटलं जातंय.

दुसऱ्या बाजुला माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतल्यानं नव्या तर्क वितर्कांना उधाण आलं आहे. दोघांमध्ये जवळपास पाऊण तास चर्चा झाली. यामुळे असं म्हटलं जात आहे. की, कॅप्टन अमरिंदर सिंग यांना भाजप राज्यसभेवर घेऊन केंद्रीय मंत्री करू शकते. तसंच अशीही चर्चा आहे की, कॅप्टन अमरिंदर सिंग यांना कृषी मंत्रिपदाची ऑफर दिली जाण्याची शक्यता आहे.

loading image
go to top