esakal | West Bengal Bypolls : ममतांची प्रतिष्ठा पणाला, मतदानाला सुरुवात
sakal

बोलून बातमी शोधा

mamta banerjee

ममतांना विधानसभा निवडणुकीत भाजपच्या सुवेंदु अधिकारी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता.

पश्चिम बंगाल पोटनिवडणूक : ममतांची प्रतिष्ठा पणाला, मतदानाला सुरुवात

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये भवानीपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी इथून लढत असल्यानं याकडे लक्ष लागून राहिलं आहे. भवानीपूरशिवाय जंगीपूर आणि समसेरगंज या मतदारसंघातही मतदान होत असून सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतमोजणी ३ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

भवानीपूर मतदारसंघातील निवडणूक ही प्रतिष्ठेची असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी महत्त्वाची आहे. मुख्यमंत्री पदी कायम रहायचं असेल तर विधानसभेचं सदस्य असणं गरजेचं आहे. ममतांना विधानसभा निवडणुकीत भाजपच्या सुवेंदु अधिकारी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर ममतांसाठी भवानीपूरमधील सोभानदेव चट्टोपाध्याय यांनी राजीनामा देत जागा रिकामी केली.

ममतांविरोधात भाजपच्या प्रियांका टिबरवाल या निवडणूक लढवत आहेत. पेशाने वकील असलेल्या प्रियांका टिबरवाल या भाजपच्या पश्चिम बंगाल युवा मोर्चाच्या उपाध्यक्ष आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराच्या घटनेविरोधात त्यांनी कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी आणि तपास सीबीआय़कडे सोपवला आहे.

हेही वाचा: Punjab: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘आप’ सक्रिय; केजरीवालांच्या दौऱ्याला सुरुवात

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींनी भाजपला नमवलं होतं. २९४ पैकी त्यांनी २१३ जागा जिंकल्या. भाजपचा राज्यात पराभव झाला असला तरी त्यांनी राज्यात दोन नंबरचा पक्ष म्हणून स्थान निर्माण केलं. भाजपने पश्चिम बंगालमध्ये ७७ जागा जिंकल्या आहेत.

loading image
go to top