
Amritpal Singh : 'पंजाबने खूप सहन केलं, पण आता नाही..; अकाल तख्तचा इशारा
नवी दिल्ली - खलिस्तान समर्थक नेता अमृतपाल सिंग याला अटक करण्यासाठी पंजाब पोलिसांनी मोठी मोहीम सुरू केल्यानंतर शिख बांधवांची सर्वोच्च संस्था अकाल तख्तचे जत्थेदार ज्ञानी हरप्रीत सिंग यांनी आज राज्यात दहशतीचे वातावरण निर्माण करू देऊ नये, असे आवाहन सरकारला केले. पंजाबला आधीच खूप त्रास सहन करावा लागला आहे. आता चांगल्या भविष्याकडे वाटचाल करण्याची वेळ आल्याचं ते म्हणाले.
पंजाबला यापूर्वी अनेक खोल जखमा झाल्या असून त्या भरून काढण्यासाठी कोणत्याही सरकारने पावले उचलली नाहीत. यापूर्वी सरकारने केलेल्या भेदभावामुळे शीख तरुणांमध्ये प्रचंड असंतोष होता. काही लोक अजुनही तरुणांचे ब्रेनवॉश करून त्यांचा वापर राजकीय फायद्यासाठी करत असल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान चुकांपासून धडा घेत शिखांचे धार्मिक, राजकीय आणि आर्थिक प्रश्न सोपे केले पाहिजेत आणि शिखांमधील अलिप्ततेची भावना दूर केली पाहिजे, असे सिंग म्हणाले. वेळोवेळी होणाऱ्या भेदभावामुळे भारताच्या स्वातंत्र्यासाठी सर्वाधिक बलिदान देणाऱ्या शिखांमध्ये अलिप्ततेची भावना निर्माण झाली आहे. विद्यमान सरकारांनी आपल्या आधीच्या सरकारच्या चुकांपासून धडा घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.