
पळून जाऊन लग्न केलेल्या तरुणीला हायकोर्टानं दिला मनुस्मृतीचा दाखला!
कर्नाटक : पळून जाऊन आपल्या प्रियकराशी लग्न केलेल्या मुलीला त्याच्यासोबत राहण्याची परवानगी देताना, तिने आपल्या पालकांशी जे केलं ते तिच्या मुलांकडून तिच्याकडे परत येऊ शकतं, असा इशारा कर्नाटक हायकोर्टानं दिला आहे. यासाठी हायकोर्टानं चक्क मनुस्मृतीचा दाखला दिला. तसेच प्रियकरावरचं प्रेम हे आई-वडील आणि सामाजाच्या प्रेमापेक्षा अधिक मजबूत आणि आंधळं असतं अशी टिप्पणीही हायकोर्टानं यावेळी केली. (Quoting Manusmruti Karnataka HC gives advice to girl who got married with her lover)
हेही वाचा: भारतीय स्वातंत्र्य लढ्यानं अनेक देशांनां प्रेरणा दिली - PM मोदी
टीएल नागाराजू यांनी हायकोर्टात हेबिअस कॉर्पस दाखल केली होती. यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, आपली मुलगी निसर्गा ही इंजिनिअरिंगची विद्यार्थीनी असून ती आपल्या कॉलेजच्या हॉस्टेलवरुन गायब झाली आहे. निखिल ऊर्फ अभी नामक एक ड्रायव्हर तरुण तिला जबरदस्तीनं आपल्यासोबत घेऊन गेला. दरम्यान, निसर्गा आणि निखिल हे न्या. बी. विरप्पा आणि न्या. केएस हेमलेखा यांच्या कोर्टात हजर झाले. यावेळी निसर्गानं कोर्टाला सांगितलं की, "आपण वयानं सज्ञान आहोत. माझं निखिलवर प्रेम असून माझ्या मर्जीनं मी त्याच्यासोबत गेले होते. आम्ही दोघांनी १३ मे रोजी एका मंदिरात जाऊन लग्न केलं, त्यानंतर आम्ही दोघंही एकत्र राहत होतो. पूर्ण विचारांती मी हा निर्णय घेतला आहे" यानंतर कोर्टानं तिच्या पालकांना आणि तिला काही सल्ले दिले.
हेही वाचा: सोमय्या पिता-पुत्रांनी INS विक्रांतसाठी किती पैसे गोळा केले? हायकोर्टानं मागवली माहिती
कोर्टानं सल्ला देताना म्हटलं की, आपला इतिहास हे सांगतो की, पालक आपल्या मुलांसाठी आपलं जीवन समर्पित करतात आणि मुलंही आपलं जीवनं पालकांसाठी समर्पित करतात. जर या दोघांमध्ये प्रेम आणि आपुलकी असेल तर कुटुंबात तेढ निर्माण होऊ शकत नाही आणि मुलांनी पालकांच्या विरोधात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही किंवा पालकांनी मुलांच्या विरोधात त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी न्यायालयात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
कोर्टानं मुलीला दिला मनुस्मृतीचा दाखला
कोर्टानं यावर टिप्पणी करताना म्हटलं, या खटल्यातील तथ्ये आणि परिस्थिती हेच दर्शविते की 'प्रेम हे आई-वडील, कुटुंबातील सदस्य आणि समाजाच्या प्रेमापेक्षा आंधळं आणि अधिक शक्तिशाली शस्त्र आहे. यावेळी कोर्टानं निसर्गाला एक इशाराही दिला की, मुलांना हे कळायला हवं की, जीवनात काही गोष्टी या पुन्हा आपल्याकडेच येतात. आपण आत्ता आपल्या आई-वडिलांशी ज्या प्रकारे वागतो आहोत तेच उद्या पुन्हा जसंच्या तसं आपल्याकडे येणार आहे. यावेळी कोर्टानं मनुस्मृतीचा दाखला देताना सांगितलं की, “मनुस्मृतीनुसार, कोणतीही व्यक्ती आपल्या जन्मासाठी आणि प्रौढावस्थेपर्यंत वाढवण्यापर्यंतच्या सर्व त्रासांसाठी आई-वडिलांची परतफेड 100 वर्षांतही करू शकत नाही. त्यामुळे तुमच्या आई-वडिलांना आणि तुमच्या शिक्षकांना जे आवडते तेच करण्याचा नेहमी प्रयत्न करा, कारण तेव्हाच तुम्ही केलेल्या कोणत्याही धार्मिक उपासनेचे फळ मिळते”
Web Title: Quoting Manusmruti Karnataka Hc Gives Advice To Girl Who Got Married With Her Lover
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..