
कुतुबमिनार नव्हे विष्णूस्तंभ? आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
नवी दिल्ली -राष्ट्रीय राजधानी दिल्लीचे एक मुख्य आकर्षण असलेल्या ७३ मीटर उंचीच्या कुतुबमीनारचे नाव बदलून ते विष्णू स्तंभ करावे, या मागणीसाठी काही हिंदुत्त्ववादी संघटनानी आज या परिसरात आंदोलन व हनुमान चालीसा पाठ केला. यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी कुतुबमीनार परिसरातील सुरक्षा बंदोबस्त वाढविला आहे. दुसरीकडे दिल्ली भाजपने अकबरासह मुस्लिम शासकांच्या नावांच्या रस्त्यांची नावे बदलण्याची मागणी पुन्हा लावून धरली आहे. पोलिसांनी आजच्या आंदोलन प्रकरणी राष्ट्रवादी शिवसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जयभगवान गोयल व त्यांच्या साथीदारांना ताब्यात घेतले होते. गोयल यांनी यापूर्वी दिल्ली निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी 'महाराज' यांच्याशी केली वादग्रस्त पुस्तक प्रकाशित केले होते.
कुतुबमिनारची उभारणी करताना २७ हिंदू व जैन मंंदिरे पाडून टाकल्याचा दावा याच परिसरातील एका शिलालेखाच्या व काही मूर्तींच्या आधारे केला जातो. हा शिलालेख आजही येथे कायम आहे. हा मूलथः विष्णू स्तंभ असल्याने याचे नाव बदलावे अशी मागणी आहे. येथील २७ मंदिरांचे पुनर्निर्माण करावे अशी मागणी विश्व िहंदू परिषदेने केली आहे. या परिसरातील कुव्वत- उल-इस्लाम मशिदीच्या भिंतींना लागूनच काही गणेशमूर्ती आजही दिसतात. मात्र या गणपतीच्या मूर्ती उलट्या असल्याने त्यांचाही जीर्णोद्धार करावा अशी मागणी करून हिंदू संघटनांनी रोष व्यक्त केला आहे. विहिंपचे प्रवक्ते विनोद बन्सल यांनी सांगितले की कुतूब मिनारची निर्मिती एका हिंदू राजाच्या काळात करण्यात आली व त्याचे मूळचे नाव विष्णू स्तंभ असे होते. येथे २७ मंदिरे होती याचे पुरावे आजही आहेत. जैन व हिंदूधर्मीयांची ही मंदिरे पाडून टाकल्याचाही दावा त्यांनी केला. काही हिंदू कार्यकर्त्यांनी कुतूबमिनारचे नाव बदलण्याची मागणी करत या परिसरात आज निदर्शने केली व हनुमान चालीसाचे पठण केले. यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते.
रस्त्यांच्या नावबदलाची मागणी
कॉंग्रेसचे राष्ट्रीय मुख्यालय असलेल्या अकबर रस्त्यासह मुस्लिम शासकांच्या नावांच्या रस्त्यांची नावे बदलून ती हिंदू राजे व महापुरूषांच्या नावाने करण्याची मागणी दिल्ली भाजपने पुन्हा केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी नवी दिल्ली नगरपालिका परिषदेला (एनडीएमसी) याबाबत पत्र लिहून ‘मुस्लिम गुलामीचे प्रतीक' असलेल्या या रस्त्यांची नावे बदलण्याची मागणी केली आहे. यापूर्वी भाजप नेते विजय गोयल यांनी बाबर रस्त्याच्या नावाला काळे फासले होते. मात्र गुप्ता यांच्या यादीत बाबर रस्ता व बाबर लेनचा उल्लेख नाही. तुघलक रस्ता (गुरु गोविन्द सिंह मार्ग), अकबर रोड (महाराणा प्रताप रोड), औरंगज़ेब लेन (डॉ.अब्दुल कलाम लेन), हुमायूं रस्ता(महर्षी वाल्मिकी रस्ता) व शाहजहान रस्ता (जनरल बिपिन सिंह रावत रस्ता) असे नावबदल करावेत अशी मागणी गुप्ता यांनी केली आहे.
भाजपचे सरकार केंद्रात व नंतर उत्तर प्रदेशात आल्यावर रस्ते, रेल्वेस्थानके व गावांची नावे बदलण्याच्या मोहीमेने वेग पकडला. मात्र नावबदलांची ही परंपरा दिल्लीत नवीन नाही. कॉंग्रेस कार्यकाळात एतिहासिक कॅनॉट प्लेसचे नामकरण राजीव चौक असे करण्यात आले तेव्हा कॉंग्रेसच्याच नेत्यांनी ही ‘चापलुसी‘ असल्याची टीका केली होती परिणामी मेट्रोतील उद्घोषणा वगळता इंदिरा गांधी चौक व राजीव चौक ही नावे आजही प्रचलित होऊ शकलेली नाहीत.
नावबदलाचा नियम
दिल्लीतील रस्त्यांच्या नावबदलाबाबत विशिष्ट नियम आहेत. त्याआधारेच यापूर्वी पंतप्रधान निवासस्थान असलेल्या रेसकोर्स रस्त्याचे नाव लोककल्याण मार्ग व औरंगजेब रस्त्याचे नाव माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम आझाद रस्ता असे करण्यात आले होते. ल्यूटियन्स दिल्लीतील रस्त्यांची नावे बदलण्यासाठी एनडीएमसीच्या याबाबतच्या १३ सदस्यीय समितीची मंजुरी आवश्यक असते. रस्त्यांची नावे बदलणे हे इतिहास व लोकभावना लक्षात घेऊन केले पाहिजे व तसे अपवादात्मक स्थितीतच करावे असा एनडीएमसीचा नियम सांगतो. भाजपने नावबदलांचा मुद्दा राष्ट्रीय अस्मितेशी जोडून नवी चर्चा सुरू करून दिली आहे.
भाजपची सूचना
तुग़लक रस्ता - गुरु गोविन्द सिंग मार्ग
अकबर रस्ता - महाराणा प्रताप रस्ता
औरंगजेब लेन -डॉ. अब्दुल कलाम लेन
हुमायूँ रस्ता - महर्षि वाल्मीकि रस्ता
शाहजहाँ रस्ता - जनरल बिपिन सिंह रावत रस्ता
Web Title: Qutub Minar As Vishnustambha Movement Of Hindu Organizations Pm Narendra Modi Chhatrapati Shivaji Maharaj Delhi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..