हवाई दलाची ताकद वाढणार, एप्रिल 2021 पर्यंत आणखी 16 राफेल भारतात येणार

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 28 October 2020

सध्या भारतीय हवाईदलाच्या ताफ्यात 5 राफेल विमाने सहभागी झाले आहेत.

नवी दिल्ली- चीनबरोबर तणाव सुरु असतानाच भारताच्या ताकदीत आणखी वाढ होणार आहे. पाच राफेल विमान आल्यामुळे भारतीय हवाई दलाची ताकद यापूर्वीच वाढली आहे. आता त्यात आणखी वाढ होणार आहे. कारण राफेल लढाऊ विमानांची दुसरी खेप लवकरच भारतात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 5 नोव्हेंबर रोजी तीन राफेल विमाने हरियाणातील अंबाला एअरबेसवर पोहोचतील. त्याचबरोबर भारतीय हवाई दलाची मारक क्षमता 2021 पर्यंत आणखी वाढेल. कारण भारतीय हवाईदलाच्या गोल्डन अ‍ॅरो स्क्वाड्रन ताफ्यात तोपर्यंत 16 राफेल विमानांचा समावेश केला जाईल. 

'हिंदुस्थान टाइम्स'ने याबाबतचे वृत्त दिले आहे. सध्या भारतीय हवाईदलाच्या ताफ्यात 5 राफेल विमाने सहभागी झाले आहेत. याचवर्षी 29 जुलै रोजी भारतीय हवाईदलात पाच राफेल विमानांची पहिली खेप फ्रान्समधून अंबाला एअरबेसवर आली होती. हे सर्व लढाऊ विमाने भारतीय हवाईदलाच्या 17 व्या स्क्वॉड्रनमध्ये सहभागी झाले होते. हवाई दलाने फ्रान्सकडून 59 हजार कोटी रुपयांमध्ये 36 राफेल विमानांसाठी करार केला आहे. 

हेही वाचा- फ्रान्सचे नागरिकांना आवाहन-सावध राहा

तीन लढाऊ विमानांचा पुढील ताफा 5 नोव्हेंबर रोजी फ्रान्समधून थेट अंबाला येथे येईल. या प्रवासादरम्यान हे विमान कुठेच उतरणार नाही. या विमानात हवेमध्येच इंधन भरण्याची क्षमता आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. मागीलवेळी ही विमाने अबूधाबीवर थांबून आले होते. 

सध्या भारतात असलेल्या राफेल विमानाचा प्रशिक्षणासाठी वापर केला जात आहे. भारतीय हवाई दलाचे पायलट यात प्रशिक्षण घेतल आहेत. 

हेही वाचा- पाच नोव्हेंबरला देशभरात ‘चक्का जाम’ आंदोलन

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्रान्समधून आणखी तीन राफेल विमाने जानेवारीत भारतात येतील. त्याचबरोबर मार्चमध्ये तीन आणि एप्रिलमध्ये सात विमाने येतील. अशापद्धतीने भारतीय हवाईदलाला 21 एक आसन क्षमता असलेले लढाऊ विमाने आणि 7 दोन आसन क्षमता असलेले विमाने सोपवली जातील. याचाच अर्थ एप्रिलपर्यंत गोल्डन अ‍ॅरो स्क्वाड्रनच्या ताफ्यात 18 लढाऊ विमानांचा समावेश केला जाईल आणि उर्वरित तीन विमाने चीनचा धोका पाहता उत्तर बंगालमधील अलीपूरद्वार येथील हाशिमारा एअरबेसवर पाठवले जाऊ शकते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rafale in India Indian Air Force to get a 16 fighters to land by April