esakal | राहुल बजाज यांचा ‘बजाज ऑटो’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा

बोलून बातमी शोधा

Rahul Bajaj

गेल्या पाच दशकांपासून त्यांच्याच नेतृत्वाखाली कंपनीने अनेक शिखरं पादाक्रांत केली आहे. एकेकाळी भारतात बजाज हा स्कूटरला पर्यायी शब्द मानला जात होता.

राहुल बजाज यांचा ‘बजाज ऑटो’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा
sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली : बजाज ऑटो कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष राहुल बजाज यांनी कंपनीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. त्यांच्या जागी नीरज बजाज यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राहुल बजाज हे १९७२ पासून कंपनीचे अध्यक्ष आहेत आणि गेल्या जवळपास पाच दशकांपासून ‘बजाज ग्रुप ऑफ कंपनी’शी संबंधित आहेत. आता त्यांनी आपल्या वाढत्या वयाचे कारण देत या पदाचा राजीनामा दिला आहे.

१ मेपासून राहुल बजाज हे कंपनीचे चेअरमन एमिरेट्स हे पद सांभाळतील. तर कंपनीच्या अध्यक्षपदाची धुरा नीरज बजाज यांच्या खांद्यावर असणार आहे. ६७ वर्षीय नीरज यांच्याकडे ३५ वर्षांचा तगडा अनुभव आहे. त्यांनी अमेरिकेतील हॉर्वर्ड बिजनेस स्कूलमधून एमबीएपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे.

हेही वाचा: माजी अ‍ॅटर्नी जनरल सोली सोराबजी यांचं कोरोनामुळे निधन

देशातील प्रमुख कंपन्यांमध्ये बजाज ऑटोचा समावेश राहुल बजाज यांच्याच कारकीर्दीत झाला. गेल्या पाच दशकांपासून त्यांच्याच नेतृत्वाखाली कंपनीने अनेक शिखरं पादाक्रांत केली आहे. एकेकाळी भारतात बजाज हा स्कूटरला पर्यायी शब्द मानला जात होता. लोकांनी स्कूटरकडे पाठ फिरवल्यानंतर बजाजने आपली ओळख बाईक कंपनी अशी बनवली.

राहुल बजाज हे आता फक्त सल्लागार म्हणून काम करणार आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा कंपनीला होईल. कंपनीच्या बोर्डाने यावर मोहर उमटवली असून वार्षिक सभेत शेअर धारकांकडूनही याबाबत मंजूरी घेण्यात येणार आहे. विशेष गोष्ट म्हणजे बजाज समूह ९५ वर्ष जुनी संस्था आहे. आणि राहुल बजाज हे ८२ वर्षांचे आहेत. बजाज समूहाचे प्रमुख असलेल्या राहुल यांची एकूण संपत्ती ४९ हजार कोटी रुपये आहे.

हेही वाचा: १०३ मॅचमध्ये फक्त २ शतकं, धोनीच्या निर्णयानं रोहितचं आयुष्य बदललं

देशातील आघाडीची ऑटो कंपनी असलेल्या ‘बजाज ऑटो’चा नफा मार्च तिमाहीत वार्षिक आधारावर १.७ टक्क्यांनी वाढून १३३२.१ कोटी रुपये झाला. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा नफा १३१०.३ कोटी रुपये होता. कंपनीने १४० रुपये प्रति शेअर लाभांशाची घोषणा केली आहे. आर्थिक वर्ष २०२१ च्या चौथ्या तिमाहीत कंपनीच्या महसुलात चांगली वाढ झाली आहे. मार्च तिमाहीत कंपनीचा महसूल २६.१ टक्क्यांनी वाढून ८५९६.१ कोटी रुपये झाला, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत ६,८१५.९ कोटी रुपये होता.