Loksabha 2019 : राहुल गांधींचा मार्ग मोकळा; अमेठीतील उमेदवारी वैध

वृत्तसंस्था
सोमवार, 22 एप्रिल 2019

अमेठीतील राहुल यांची उमेदवारीच रद्द करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आल्यानंतर भाजपच्या टीकेला धार चढली होती. राहुल यांनी हा वाद निस्तारावा आणि मग निवडणुकीला सामोरे जावे, असे भाजपने म्हटले होते.

नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नागरिकत्व आणि शिक्षणावरून भाजपने काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्यानंतर आज (सोमवार) राहुल गांधींना दिलासा मिळाला आहे. अमेठीतील राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आला आहे.

अमेठीतील राहुल यांची उमेदवारीच रद्द करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आल्यानंतर भाजपच्या टीकेला धार चढली होती. राहुल यांनी हा वाद निस्तारावा आणि मग निवडणुकीला सामोरे जावे, असे भाजपने म्हटले होते. आता निवडणूक अधिकाऱ्यांनी आज (सोमवारी) निर्णय घेत राहुल गांधींचा उमेदवारी अर्ज वैध ठरविला आहे.  अमेठीच्या बालेकिल्ल्यात राहुल कोंडीत सापडल्याने काँग्रेस कार्यकर्ते हवालदिल झाले होते. पण, आता त्यांना दिलासा मिळाला आहे. 

अमेठीतील अपक्ष उमेदवार ध्रुवलाल यांनी राहुल यांच्या उमेदवारीला आक्षेप घेतला होता. अधिकाऱ्यांनी शपथपत्रामध्ये नेमके काय लिहिण्यात आले आहे, त्याची सत्यता पडताळून पाहून त्यांचा अर्ज वैध ठरविला आहे.  

ब्रिटिश नागरिकत्व 
राहुल यांनी 2004 मध्ये ज्या कंपनीत गुंतवणूक केली तिला आपण ब्रिटिश नागरिक असल्याचे सांगितले. भारतीय कायद्यानुसार अन्य देशाचे नागरिकत्व मिळाल्यानंतर त्याचे येथील नागरिकत्व संपुष्टात येते. याबाबत काँग्रेसच्या अध्यक्षांनीच उत्तर द्यायला हवे. संबंधित ब्रिटिश कंपनीने चुकीचे निवेदन दिले असेल, तर राहुल यांनी तिच्यावर कारवाई करायला हवी. राहुल यांनी 2004 साली सादर केलेले शपथपत्र आणि 2014 मधील शपथपत्र यातील माहिती पडताळून पाहिल्यास त्यांनी माहिती आणि तथ्ये दडविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते, असे भाजपने म्हटले होते. 

शिक्षणावरून वाद 
राहुल यांनी सुरवातीस केम्ब्रिज विद्यापीठातून डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्‍समधून एम.फील केल्याचा दावा केला होता, पण नंतर मात्र त्यांनी डेव्हलपमेंट स्टडीजमधून शिक्षण घेतल्याचे म्हटले आहे. अधिक माहिती अंती राहुल व्हिन्सी आणि राहुल गांधी यांना एका विशिष्ट वर्षात पदवी मिळाल्याचे दिसून येते.

Web Title: Rahul Gandhi’s nomination valid, declares Amethi EC officer