
Rahul Gandhi: "अहंकारी राजा चिरडतोय जनतेचा आवाज" ; कुस्तीपटूंवरील कारवाईवरून राहुल गांधी आक्रमक!
Rahul Gandhi : जंतर-मंतरवर सुरू असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलंनाविरोधात पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरहून नवीन संसद भवनाकडे कूच करणाऱ्या कुस्तीपटूंना ताब्यात घेतले. दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरवरील कुस्तीपटूंचा तंबूही हटवला आहे. याबाबत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
राहुल गांधी म्हणाले, "राज्याभिषेक पूर्ण, अहंकारी राजा रस्त्यावर जनतेचा आवाज चिरडत आहे"
राहुल गांधी यांनी नाव न घेता नरेंद्र मोदी यांच्यावर निशाना साधला आहे. देशाच्या नव्या संसद भवनाचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमास देशातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. दुसरीकडे नवीन संसद भवनाच्या समोर आंदोलनासाठी निघालेल्या कुस्तीपटूंना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यावेळी पोलीस- कुस्तीपटूंमध्ये राडा झाल्याचे देखील पाहायला मिळालं.
पोलिसांनी देशासाठी पदक जिंकणाऱ्या खेळाडूंची धरपकड केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राहुल गांधी यांनी देखील हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. एकीकडे देशात नव्या संसद भवनाचे उद्घाटन होत आहे आणि दुसरीकडे खेळाडूंना मात्र वाईट वागणूक दिली जात असल्याबद्दल सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.
कुस्तीपटू साक्षी मलिकने या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. साक्षीने या व्हिडीओ सोबत देशातील चॅम्पियन्सना अशीच वागणूक दिली जात आहे. अख्खं जग आपल्याला पाहत आहे! असं कॅप्शन दिले आहे.