
Wrestlers Protest : सत्यमेव जयते! महिला खेळाडूंची स्थिती दर्शवणारी दोन फोटो कोणता खरा कोणता खोटा?
देशाच्या नव्या संसद भवनाचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमास देशातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. दुसरीकडे नवीन संसद भवनाच्या समोर आंदोलनासाठी निघालेल्या कुस्तीपटूंना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यावेळी पोलीस- कुस्तीपटूंमध्ये राडा झाल्याचे देखील पाहायला मिळालं.
यानंतर क्रिडाप्रेमी आणि राजकीय नेत्यांकडून खेळाडूंना मिळत असलेल्या वागणूकीवरून टीका केली जात आहे. एकीकडे देशात नव्या संसद भवनाचे उद्घाटन होत आहे आणि दुसरीकडे खेळाडूंना मात्र वाईट वागणूक दिली जात असल्याबद्दल सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.
तसेच पोलिसांनी कुस्तीपटूंना नवीन संसद भवनाकडे जाताना रोखल्यानंतर खेळाडू आणि पोलिसांत झालेल्या झटापटीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचे उद्घाटन झाले. या इमारतीसमोरच भारतीय महिला कुस्तीपटू आंदोलन करणार होत्या. मात्र त्यापूर्वीच कुस्तीपटू आणि त्यांच्या समर्थकांना दिल्ली पोलिसांनी अटक केली. कुस्तीपटू साक्षी मलिकने या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे.
साक्षीने या व्हिडीओ सोबत देशातील चॅम्पियन्सना अशीच वागणूक दिली जात आहे. अख्खं जग आपल्याला पाहत आहे! असं कॅप्शन दिलं आहे. मात्र दुसरीकडे दिग्गज धावपटू आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष पीटी उषा यांनी नव्या संसद भवन उद्घाटन कार्यक्रमात सहभागी झाल्याचे फोटो शेअर केले आहेत.
पीटी उषा यांनी या फोटोंना दिलेल्या कॅप्शनमध्ये नवीन संसदेच्या भव्यतेचे साक्षीदार होण्याचा बहुमान मिळाला. नवीन भारताच्या उदयाचे प्रतीक असलेल्या सेंगोलसह, मला खात्री आहे की ते आपल्या देशाला नीतिमत्ता आणि न्यायाच्या मार्गाने समृद्ध करेल. खरंच एक ऐतिहासिक दिवस! असं कॅप्शन दिलं आहे.
दरम्यान या फोटोंमध्ये त्या नवीन संसदेच्या इमारतीत बसल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच त्यांनी संसदेच्या इतर भागात काढलेले फोटो देखील शेअर केले आहेत.
पीटी उषा या भारतीय ऑलिम्पिक संघटनेची (आयओए) पहिली महिला अध्यक्ष बनल्या आहेत. असे असून देखील महिला कुस्तीपटूंना न्यायासाठी रस्त्यावर उतरावे लागले आहे, दिल्लीच्या जंतर मंतरवर भारतीय महिलाकुस्तीपटू बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करत त्यांच्या अटकेची मागणी केली होती. खेळाडूंच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत म्हणून आज कुस्तीपटू नवीन संसद भवनाबाहेर आंदोलन करणार होते. मात्र त्याआधीच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दिल्ली पोलिसांनी अटक केल्यानंतर साक्षी मलिक आणि विनेश फोगाट यांनी भारताच्या कन्या वेदनेत असताना पंतप्रधान नवीन संसद भवनाचे उद्घाटन करत आहेत यावर प्रश्न विचारला. महिला कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप करत त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे.
साक्षी मलिकने ट्विट केले की, 'मी सर्व आंतरराष्ट्रीय कुस्तीपटूंना सांगू इच्छिते की आमचे पंतप्रधान नवीन संसद भवनाचे उद्घाटन करत आहेत. मात्र दुसरीकडे आमच्या समर्थकांना अटक केली जात आहे. लोकांना अटक करून आपण कसं काय म्हणू शकतो की ही लोकशाहीची जननी आहे. भारताच्या कन्या वेदनेत आहेत.'