Rahul Gandhi : मदतीची रक्कम वाढवा, लवकर द्या;राहुल गांधी यांच्याकडून हाथरस येथे पीडित कुटुंबीयांचे सांत्वन

‘चेंगराचेंगरीचा अनेक कुटुंबांना मानसिक आघात झाला आहे. प्रशासनाचे अपयश दिसते आणि व्यवस्थापनात गंभीर चुकाही झाल्या आहेत. त्या शोधायला हव्यात. या घटनेतील पीडितांच्या कुटुंबीयांना योग्य भरपाई मिळायला हवी. मुख्यमंत्र्यांनी अधिकाधिक आणि लवकर मदत द्यावी,
Rahul Gandhi
Rahul Gandhi sakal
Updated on

घुसमटलेले निष्पाप जीव

हाथरस/अलिगड : ‘‘चेंगराचेंगरीचा अनेक कुटुंबांना मानसिक आघात झाला आहे. प्रशासनाचे अपयश दिसते आणि व्यवस्थापनात गंभीर चुकाही झाल्या आहेत. त्या शोधायला हव्यात. या घटनेतील पीडितांच्या कुटुंबीयांना योग्य भरपाई मिळायला हवी. मुख्यमंत्र्यांनी अधिकाधिक आणि लवकर मदत द्यावी,’’ अशी मागणी आज काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केली. हाथरसच्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांची आणि कुटुंबीयांची राहुल गांधी यांनी भेट घेतली. त्यांना धीर देत काळजी करू नका, मी तुमच्या सोबत आहे, अशा शब्दांत आधार दिला.

हाथरस येथील चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले. पीडित कुटुंबीयांसाठी उत्तर प्रदेश सरकारने मदत जाहीर केली आहे. मात्र यापेक्षा अधिक मदत असावी, अशी अपेक्षा राहुल गांधी यांनी व्यक्त केली. राहुल गांधी आज सकाळीच अलीगड येथे दाखल झाले आणि त्यांनी पिलखाना गावातील पीडित लोकांची भेट घेतली. पीडितांशी चर्चा केल्यानंतर पत्रकारांशी बोलले.

ते म्हणाले, या घटनेचा अनेक कुटुंबांना धक्का बसला असून अनेकांचे हकनाक जीव गेले आहेत. आपण राजकीय दृष्टिकोनातून बोलत नसून प्रशासनात निश्‍चितच त्रुटी राहिल्याचे स्पष्ट दिसते. व्यवस्थापनात चुकाही झाल्या आहेत. त्या शोधण्याची गरज आहे. पीडित कुटुंबीयांसाठी हा कठीण काळ आहे आणि त्यांना तत्काळ मदत करायला हवी. बहुतांश पीडित गरीब वर्गातील आहेत. ते खूपच गरीब असून त्यांना अधिक मदत मिळणे गरजेचे आहे. तुम्ही सहा महिन्यानंतर किंवा वर्षभरानंतर मदत करत असाल तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. लवकरात लवकर मदत देणे आवश्‍यक आहे. आपण व्यक्तिश: पीडित कुटुंबीयांशी बोललो, असेही ते म्हणाले. प्रशासनात नक्कीच उणिवा होत्या.एवढा मोठा कार्यक्रम होत असताना तेथे पोलिस बंदोबस्त नव्हता, ही आश्‍चर्यकारक बाब आहे.

तत्पूर्वी राहुल गांधी आज सकाळीच दिल्लीहून रवाना झाले. त्यांच्यासमवेत प्रदेशाध्यक्ष अजय राय, अविनाश पांडे, सुप्रिया श्रीनेत यांच्यासह अन्य पदाधिकारी होते. राहुल गांधींच्या दौऱ्यामुळे अलीगड, हाथरस येथे सुरक्षा वाढविण्यात आली. हाथरसच्या प्रमुख मार्गावर बंदोबस्त ठेवण्यात आला आणि विभवनगर कॉलनीत सुरक्षा रक्षकांचे कडे करण्यात आले होते. ते अगोदर पिलखाना गावात पोचले आणि नंतर हाथरस येथे पोचले. पीडित कुटुंबीयांचे सांत्वन करत त्यांनी धीर दिला.

‘लोको पायलट’ यांच्याशी राहुल गांधी यांचा संवाद

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नवी दिल्ली रेल्वे स्थानकात जाऊन रेल्वे चालकांच्या अर्थात लोको पायलट्सच्या समस्या जाणून घेतल्या. सुमारे ५० लोको पायलट्ससोबत गांधी यांनी संवाद साधला. जास्त वेळ काम करावे लागत असल्याने ताण पडतो. आठवड्यातून किमान ४६ तास विश्रांती मिळणे आवश्यक असल्याचे अनेक लोको पायलट्सनी गांधी यांना सांगितल्याचे नंतर कॉँग्रेस पक्षाकडून सांगण्यात आले. रेल्वे कायदा १९८९ नुसार आठवड्यातून ४६ तास विश्रांती देण्याचा नियम आहे. पण या नियमाचे पालन होत नसल्याचे चालकांकडून सांगण्यात आल्याचा दावा देखील कॉँग्रेसकडून करण्यात आला. पुरेशी विश्रांती मिळत नसल्यामुळे रेल्वे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. शिवाय सरकारकडून नव्याने लोको पायलट्सची भरती केली जात नसल्याने सध्या सेवेत असलेल्या चालकांवर जास्त भार येत असल्याचे राहुल गांधी सांगण्यात आल्याचे कॉँग्रेसकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.

प्रमुख आरोपींचा शोध सुरू

हाथरस प्रकरणातील मुख्य आरोपीचा शोध घेतला जात आहे. राज्यात आणि राजस्थान, हरियानातही मुख्य आरोपी देवप्रकाश मधुकरचा शोध घेतला जात आहे. शिवाय प्रवचनकार सूरजपाल ऊर्फ नारायण साकार हरी ऊर्फ भोले बाबा यांची चौकशी होण्याची शक्यता असून त्यांचाही तपास केला जात आहे. मधुकर हा मुख्य सेवादार असून तोच सत्संगाचा संयोजक होता. त्याचेच एफआयआरमध्ये नाव असून सूरजपाल यांच्या नावाचा उल्लेख नाही. आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.