मोदींच्या या 3 अपयशांचा हार्वर्ड स्कूलमध्ये अभ्यास होईल; राहुल गांधींचा टोला

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 6 जुलै 2020

काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गाधी यांनी ट्विट करुन पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली- काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गाधी यांनी ट्विट करुन पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. भविष्यात हार्वर्ड बिजनेस स्कूलमध्ये अपयशांचे अध्ययन करताना पंतप्रधान मोदी यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उचलेल्या उपायांचाही समावेश होईल, असं म्हणत त्यांनी टोला लगावला आहे. 

ब्रेकिंग - रत्नागिरीत सापडले आणखी ४० नवे कोरोना पॉझिटीव्ह....
कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढीवरुन राहुल गांधींनी मोदींवर टीका केली आहे. त्यांनी मोदींच्या भाषणाची एक व्हिडिओ क्लिप ट्विटरवर शेअर केली आहे. ज्यात पंतप्रधान मोदी म्हणतात की, महाभारताचे युद्ध 18 दिवस चालले होते, पण कोरोनाची लढाई 21 दिवस चालेल. राहुल गांधींनी या व्हिडिओमध्ये एक ग्राफही जोडला आहे. ज्यात भारतातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कशी वाढत आहे हे दाखवण्यात आलं आहे. भारत कोरोनाबाधितांच्या संख्येत रशियाला मागे टाकत तिसऱ्या स्थानी आला आहे.

राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटलंय की, 'भविष्यात हार्वर्ड बिजनेस स्कूल अपयशांचे अध्ययन करेल, ज्यात कोविड-19, नोटबंदी आणि जीएसटी या मुद्द्यांचा नक्की समावेश असेल'. भारताची कोरोनाग्रस्तांची संख्या रविवारी रशियापेक्षाही अधिक झाली आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदींवर टीका केली आहे. जगात कोरोना बाधितांच्या संख्येत अमिरेका पहिल्या क्रमांकावर आहे, तर ब्राझिल दुसऱ्या स्थानी आहे.

गेल्या 24 तासात भारतात 24,248 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, तर 425 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 7 लाखांच्या जवळ जाऊन ठेपली आहे. देशात आतापर्यंत 6,97,413 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. आतापर्यंत 19,693 जणांचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे. भारतात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचं दिसत आहे.

प्रियांका गांधी यांचा सरकारी बंगला भाजप आयटी सेल प्रमुखाला मिळणार
समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत 4,24,432 कोरोनाग्रस्त बरे झाले आहेत. सध्या देशात 2,53,287 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. स्वास्थ मंत्रालयाच्या माहितीनुसार, रुग्ण बरे होण्याचा दर 60.85 टक्के आहे. तसेच रविवारी एकूण 1,80,595 लोकांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. देशात मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या घेण्यात येत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rahul gandhi criticize narendra modi on covid 19 cases