
Rahul Gandhi : सारे काही शेटजींचे, शेटजी साहेबांचे
नवी दिल्ली : सुरतच्या अपिलीय न्यायालयाचा निकाल विरोधात गेला असला तरी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अदानी प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील हल्ला आणखी तीव्र केला आहे. "सारे काही शेटजींचे आणि शेटजी साहेबांचे," अशा शब्दांत त्यांनी टोला लगावला.
राहुल यांनी याबाबत ट्विट केले आहे. उद्योगपती गौतम अदानी यांची पंतप्रधान मोदींबरोबरील छायाचित्रे, अदानी उद्योग समुहाच्या व्यवसायांचा नकाशा वापरून बनविलेली चित्रफित त्यांनी पोस्ट केली आहे.
त्यांनी म्हटले आहे की, विमानतळे शेटजींची, बंदरे शेटजींची, वीज शेटजींची, कोळसा शेठजींचा, रस्ते शेटजींचे, खाणी शेठजींच्या, जमीन शेटजींची, आकाश शेटजींचे. शेटजी कोणाचे? शेटजी "साहेबां"चे ! असा टोला त्यांनी लगावला.
‘पंतप्रधान म्हणतात की सबका साथ आणि सबका विकास, पण आज देशाचे सरकार एकाच व्यक्तीसोबत उभे आहे आणि एकाच व्यक्तीचा पूर्ण विकास करते,‘ असा चिमटाही राहुल यांनी काढला आहे. अदानींच्या व्यवसायाचा २०१४च्या पूर्वीचा नकाशा दर्शवताना राहुल यांनी म्हटले आहे की, ‘व्यवसाय वाढणे चांगले आहे.
पण इथे तर चमत्कार झाल्याचे दिसते. वीज प्रकल्प, बंदरे, विमानतळ, सौर उर्जा, पवन उर्जा, खाण उद्योग, संरक्षण, ड्रोन, रस्तेबांधणी, सिमेंट अशा प्रत्येक ठिकाणी ‘अदानी-अदानी-अदानी... पंतप्रधानांना पुन्हा एकदा विचारतो, देशाची संपूर्ण संपत्ती एकाच व्यक्तीकडे का सोपविली जात आहे? यामागे कोणती शक्ती आहे ? हे कोण करीत आहे ? देशातील प्रत्येक तरुण, प्रत्येक नागरिक हे प्रश्न विचारत आहेत. किमान उत्तर तरी द्या! असे खोचक आव्हान राहुल यांनी केले आहे.
प्रियांका यांचेही ट्विट
राहुल यांच्या ट्विटपाठोपाठ त्यांच्या भगिनी प्रियांका गांधी-वद्रा यांनीही अशाच आशयाचे केले. सारे काही शेटजींचे आणि शेटजी... कोणाचे? शेठजींच्या बनावट कंपन्यांमधील २० हजार कोटी रुपये देखील कोणाचे?‘ अशा शब्दांत त्यांनी पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केले.