esakal | 'हॅलो डॉक्टर!' राहुल गांधींची नवी मोहीम; देशातील डॉक्टर्सना घातली साद

बोलून बातमी शोधा

'हॅलो डॉक्टर!' राहुल गांधींची नवी मोहीम; देशातील डॉक्टर्सना घातली साद
'हॅलो डॉक्टर!' राहुल गांधींची नवी मोहीम; देशातील डॉक्टर्सना घातली साद
sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : देशात सध्या कोरोनाचं संकट मोठ्या प्रमाणावर घोंघावत आहे. देशातील सध्यपरिस्थितीमुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आहे. या कठीण प्रसंगी सर्वांनी एकत्र येत काम करण्याची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक महत्त्वाचा असा पुढाकार घेतला आहे. त्यांनी 'हॅलो डॉक्टर' नावाची एक संकल्पना उदयास आणली आहे. या संकल्पनेअंतर्गत कोरोनाच्या या कठीण वैद्यकीय सल्ला पुरवणारी ही संकल्पना आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटरवरुन याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, भारताने एकत्र उभं राहत आपल्याच बांधवांची मदत केली पाहिजे. यासाठी आम्ही 'हॅलो डॉक्टर' नावाची वैद्यकीय सल्ला देणारी एक हेल्पलाईन चालवत आहोत. वैद्यकीय सल्ल्यासाठी +919983836838 या क्रमांकावर फोन करा. प्रिय डॉक्टर आणि मानोसोपचार तज्ज्ञांनी या अभियानात सहभागी व्हावं, आम्हाला तुमची गरज आहे, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

हेही वाचा: कोरोनाशी लढण्यासाठी सर्वसम्मत राष्ट्रीय धोरण बनवावं; काँग्रेस केंद्रासोबत

राहुल गांधी हे स्वत: अलिकडेच कोरोनाच्या संक्रमणातून गेलेले आहेत. त्यांनादेखील कोरोनाची लागण झाली होती. ते यातून सहिसलामत बाहेर पडल्यानंतर त्यांनी ही मोहीम सुरु केली आहे. देशामध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देखील कोरोनाच्या जागतिक महासाथीशी दोन हात करण्यासाठी राष्ट्रीय धोरणावर सर्वांची राजकीय सम्मती बनवण्याची विनंती आज शनिवारी केली. सोनिया गांधी यांनी आपल्या संबोधनात म्हटलं की, आता ही वेळ आलीय की, केंद्र तसेच राज्य सरकारांनी जागं व्हावं आणि आपलं कर्तव्य पार पाडावं. त्यांनी म्हटलं की, कोरोनाची लस सर्व नागरिकांना मोफत दिली गेली पाहिजे. काँग्रेस अध्यक्षांनी म्हटलं की, मी केंद्र सरकारला विनंती करते की देशात कोरोना संकटाशी मुकाबला करण्यासाठी राष्ट्रीय धोरण तयार केलं जावं आणि यासाठी सर्वांची राजकीय सम्मती घेतली जावी. केंद्र आणि राज्य सरकारने आपल्या कर्तव्याप्रती जागं होण्याची वेळ आली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं भारतात हाहाकार माजवल्याचं चित्र आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत देशात चार लाख एक हजार 993 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात तीन हजार 523 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र, पंजाब, दिल्ली, गुजरातसह देशातील प्रमुख राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं पसरत आहे.