आदिवासी विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी राहुल गांधींनी पुरवला 175 टीव्हींचा संच

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 जुलै 2020

काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी आपल्या मतदारसंघात आदिवासी विद्यार्थ्यांना 175 स्मार्ट टीव्हींचे वाटप केले आहे. कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेता यावे यासाठी त्यांनी हे वाटप केले आहे.

नवी दिल्ली- काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी आपल्या मतदारसंघात आदिवासी विद्यार्थ्यांना 175 स्मार्ट टीव्हींचे वाटप केले आहे. कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेता यावे यासाठी त्यांनी हे वाटप केले आहे. टीव्ही वाटपाची राहुल गांधी यांची ही दुसरी खेप आहे. याआधी 19 जून रोजी म्हणजे त्यांच्या वाढदिवसादिवशी वायनाड जिल्ह्यात 50 टीव्हीचे वाटप करण्यात आले होते.

केरळचे मुख्यमंत्री पीनराई विजयन यांनी ''फर्स्ट बेल'' नावाने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याची योजना आणली आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी एक वाहिनी सुरु करण्यात आली आहे. आपल्या मतदारसंघातील गरीब विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता यावा यासाठी राहुल गांधींनी टीव्ही संचाचे वाटप केले आहे. 

बातमी मागची बातमी! बंगल्यातील कामानिमित्त गेल्यानंतर झाली अविवाहित महिलेशी ओळख...
केरळच्या मल्लपुरममध्ये एका नववीत शिकणाऱ्या मुलीने ऑनलाईन वर्गाला उपस्थिती लावण्यासाठी घरी टीव्ही नसल्याने आत्महत्या केली होती. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी गरीब विद्यार्थ्यांना इलेक्ट्रोनिक उपकरणे देण्याचे वचन दिले होते. त्यानुसार त्यांनी दोन खेपांमध्ये आदीवासी मुलांना टीव्ही संचाचे वाटप केले आहे.

राहुल गांधी यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री विजयन यांना पत्र लिहिलं होतं. यात ते म्हणाले होते की, "मतदारसंघात अनेक गरीब आणि आदिवासी विद्यार्थी आहेत. त्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे सरकारने सुरु केलेल्या फर्स्ट बेल या योजनेचा ते लाभ घेऊ शकत नाहीत. त्यामुळे सरकारने अशा विद्यार्थ्यांना डिजिटल साधणांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करावी" 

सरकारने सुरु केलेली योजना चांगली आहे. मात्र, त्याचं यश विद्यार्थ्यांना डिजिटल व्यासपीठ उपलब्ध होत आहे का यावर अवलंबून आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कॉम्युटर, स्मार्टफोन, टेलीव्हीजन आणि भरवशाची इंटरनेट जोडणी आवश्यक आहे, असं राहुल गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं. 

धक्कादायक! बेरोजगारीचा टक्का वाढतोय; देशातील प्रत्येक पाचवा व्यक्ती आहे...
राहुल गांधी यांनी जिल्हाधिकाऱ्यालाही पत्र लिहिले होते. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी त्यांनी मदतीचा हात पुढे केला होता. त्यांनी ज्यांच्याकडे टीव्ही किंवा स्मार्टफोन नाही अशा कुटुंबाची यादीही तयार केली होती. विद्यार्थ्यांना डिजिटल व्यासपीठ उपलब्ध होत नाहीय, त्यामुळे गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. अशा विद्यार्थ्यांना मदत करायला मला आवडेल. त्यांच्यासाठी काही उपकरणे खरेदी करु इच्छितो, असं राहुल यांनी जिल्हाधिकाऱ्याला लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul Gandhi provide of a set of 175 TVs for online education of tribal students