राहुल गांधींचा राजीनामा एकमुखाने फेटाळला!

राहुल गांधींचा राजीनामा एकमुखाने फेटाळला!

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे राहुल गांधींनी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा देऊ केलेला राजीनामा पक्ष कार्यकारिणीने शनिवारी एकमुखाने फेटाळला. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगगड या कॉंग्रेसशासित राज्यांतील लाजीरवाणा पराभव कार्यकारिणीने गांभीर्याने घेतला असून, पक्ष संघटनेची नव्याने बांधणी करण्याचे सर्वाधिकार राहुल गांधींकडे सोपविणारा ठरावही कार्यकारिणीने संमत केला आहे. 

"यूपीए'च्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, सरचिटणीस प्रियांका गांधींसह ज्येष्ठ नेते, अन्य प्रभारी सरचिटणीस, कायम निमंत्रित सदस्य, तसेच कॉंग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पक्ष मुख्यालयात कार्यकारिणीची बैठक झाली. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ मात्र अनुपस्थित होते. बैठकीत लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे विश्‍लेषण करण्यात आले. तसेच सखोल विश्‍लेषणासाठी लवकरच पुन्हा बैठक घेण्याचेही ठरले. 
लोकसभेत कॉंग्रेसला अवघ्या 52 जागा मिळाल्या असून, 17 राज्यांमधून पक्षाचा एकही खासदार निवडून आलेला नाही. शिवाय मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या कॉंग्रेसशासित राज्यांतही पक्षाची अतिशय सुमार कामगिरी राहिली आहे.

कार्यकारिणीच्या 30 हून अधिक पदाधिकाऱ्यांनी आपापल्यापरीने राजकीय परिस्थिती आणि पराभवाची कारणे मांडली. निवडणूक आयोगाच्या पक्षपातीपणावरही चर्चा झाली. काहींनी पक्षाच्या निर्णयप्रक्रियेत वरिष्ठ नेत्यांच्या जवळच्या व्यक्तींचा हस्तक्षेप झाल्याचा ठपकाही ठेवला. राहुल गांधींच्या कार्यालयातील बिगरराजकीय व्यक्तींकडे यातून अंगुलीनिर्देशही झाला. बऱ्याच राज्यांमध्ये साध्या जिल्हाध्यक्षांची नियुक्तीही झाली नसल्याने फटका बसल्याचे मतही काहींनी मांडले. 
मात्र, लाजीरवाण्या पराभवाची जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेत राहुल गांधींनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देऊ करून सर्वांनाच धक्का दिला. निकालानंतरही राहुल यांनी राजीनाम्याचे सूतोवाच केले होते. त्यानंतर सोनिया गांधी आणि डॉ. मनमोहनसिंग यांनी त्यांची समजूत काढली.

डॉ. मनमोहनसिंग यांनी पराभवाच्या कारणांचे विश्‍लेषण आणि पक्षाच्या पुढील मार्गक्रमणाची रूपरेषा ठरविण्यासाठी समिती नेमण्याचाही सल्ला दिला. आजच्या बैठकीत पुन्हा राहुल यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव देताच सर्व कार्यकारिणी सदस्यांनी एकमुखाने राजीनामा फेटाळला. या प्रतिकूल आणि आव्हानात्मक परिस्थितीत राहुल गांधींच्या नेतृत्वाची आणि मार्गदर्शनाची आवश्‍यकता मांडणारा, पक्ष संघटनेत आमूलाग्र बदल करण्यासाठीचे सर्वाधिकार राहुल गांधींकडे सोपविणारा ठरावही संमत करण्यात आला. कॉंग्रेसवर विश्‍वास ठेवणाऱ्या सव्वाबारा कोटी मतदारांचे या ठरावातून कार्यकारिणीने आभार मानले. 

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, ए. के. ऍन्टनी, संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत कार्यकारिणीच्या ठरावाची माहिती देताना, राहुल गांधींच्या नेतृत्वावर पक्षाचा पूर्ण विश्‍वास असल्याचा पुनरुच्चार केला. लोकशाहीत विजय किंवा पराभव होतच असतो; परंतु नेतृत्व देणे महत्त्वाचे आहे. राहुल गांधींनी नेतृत्व दिले आणि ते जनतेत दिसले आहे, असे ते म्हणाले. 

पक्षाध्यक्षांवर निर्णय बंधनकारक 

पक्षातील सर्व नेत्यांचा विरोध असला, तरी राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे यावरून सस्पेन्स वाढला आहे.

या पदासाठी अन्य कोणताही नेता सक्षम नाही आणि कॉंग्रेसच्या घटनेनुसार कार्यकारिणीचा सर्वानुमते निर्णय पक्षाध्यक्षांवर बंधनकारक आहे, असाही दाखला कॉंग्रेसमधून दिला जात आहे. त्यामुळे कार्यकारिणीची पुढील बैठक महत्त्वाची ठरणार आहे. दरम्यान, कार्यकारिणीने संमत केलेल्या ठरावानुसार प्रस्तावित संघटनात्मक बदलांच्या पार्श्‍वभूमीवर बऱ्याच नेत्यांना कारवाईला सामोरे जावे लागू शकते, असेही संकेत मिळत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com